निर्दाेष सुटकेच्या निर्णयाच्या विरोधात प्रत्येक जण अपील करू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाच्या निकालाला आव्हान देणार्‍यांना मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले !

मुंबई – वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या ६ जणांच्या नातेवाइकांनी या खटल्यात ७ जणांची निर्दोष मुक्तता करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. या सातही जणांना निर्दाेष सोडण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय रहित करण्याची मागणी त्यांनी केली; मात्र पीडितांचे नातलग या खटल्यात साक्षीदार नव्हते. त्यामुळे ‘निर्दाेष सुटकेच्या निर्णयाच्या विरोधात प्रत्येक जण अपील करू शकत नाही’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने १६ सप्टेंबर या दिवशी ही मागणी करणार्‍यांना सुनावले. ‘अपीलकर्त्यांचा (ही मागणी करणार्‍यांचा) सर्व तपशील सादर करावा’, असे सांगत खंडपिठाने पुढील सुनावणी १७ सप्टेंबरपर्यंत स्थगित केली आहे.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपिठासमोर निसार अहमद हाजी सय्यद बिलाल, शेख लियाकत मोहिउद्दीन, शेख इशाक शेख युसूफ, उस्मान खान ऐनुल्ला खान, मुश्ताक शाह हारून शाह आणि शेख इब्राहिम शेख सुपदो यांनी आव्हान याचिका प्रविष्ट केली होती.