डिजेच्या गोंगाटापुढे पारंपरिक ढोल-ताशा मागे पडल्याची कलाकार सौरभ गोखले यांची खंत !

‘कलावंत ढोल-ताशा पथका’ला पुणे विसर्जन मिरवणुकीत खेदजनक अनुभव !

प्रतिकात्मक चित्र

(डिजे म्हणजे मोठा आवाज करणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा)

पुणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) – कलावंत पथकाला मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केले, त्याप्रमाणे पूर्ण पथक ठरल्या वेळी सायंकाळी ६ वाजता वादनासाठी सिद्ध होते; मात्र टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीत डिजेच्या प्रचंड गोंगाटात नाच-गाणे चालू होते. त्यामुळे विसर्जन मिरवणूक एक इंचही पुढे न सरकल्याने ठीक रात्री ९ वाजता असलेल्या जागी एक गजर करून, ध्वजवंदन करून वादनास विराम देण्याचा निर्णय घ्यावा लागला. डिजेच्या गोंगाटापुढे पारंपरिक ढोल-ताशा कुठेतरी मागे पडत आहे, अशी खंत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार सौरभ गोखले यांनी सामाजिक माध्यमातून व्यक्त केली आहे.

पुणे येथील ‘कलावंत ढोल-ताशा पथक’ हे पुष्कळ प्रसिद्ध आहे. या पथकामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार ढोल-ताशा वाजवत असतात. अनेक मानाच्या गणपतींना त्यांचे वादन असते. श्री गणेशाच्या आगमनासाठी किंवा विसर्जन मिरवणुकीसाठी हे कलाकार पुष्कळ आधीपासून सिद्धता करत असतात; मात्र विसर्जन मिरवणुकीत या कलावंत पथकाला खेदजनक अनुभव आल्याने त्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.