मुंबईतील पहिला गणेशोत्सव !

मुंबईतील पहिला गणेशोत्सव अशी ओळख असलेले केशवजी नाईक चाळ येथील ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थे’चे हे १३३ वे वर्ष आहे. वर्ष १८९३ मध्ये लोकमान्य टिळक यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन येथे गणेशोत्सव आरंभ झाला. स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वातंत्र्यासाठी झटणारे नेते गिरगावमध्ये सभा घेऊन ब्रिटीश सरकारविरुद्ध भारतियांमध्ये जागृती करत होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात नागरिकांना मोठ्या प्रमाणात संघटित करण्याचा श्री गणेशा येथून झाला. स्वातंत्र्यलढ्याला बळ देण्याचे ऐतिहासिक कार्य या गणेशोत्सवाच्या माध्यमातून झाले आहे. तेव्हापासून भक्तीभावाने या मंडळातील अनेक पिढ्यांनी ही परंपरा निरंतर जपली आहे. मातीची लहान आकर्षक गणेशमूर्ती भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. अवास्तव व्यय टाळून साधी; पण आकर्षक सजावट हे येथील वैशिष्ट्य आहे. पालखीत बसवून गणेशाची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याची परंपरा आजही जपली जाते. गणेशोत्सवात मंडळ सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करते.
ऐतिहासिक महत्त्व असलेला ‘लोकमान्य गणेशोत्सव’ !

स्वातंत्र्यपूर्वकाळात येथील ‘बेडेकर सदन, शांताराम चाळ, मालिनी ब्लॉक्स सोसायटी’ या परिसराचे योगदान अनन्यसाधारण होते. या ठिकाणी लोकमान्य टिळक, सरदार पटेल, महात्मा गांधी, ॲनी बेझंट, डॉ. नारायण सावरकर, लाला लजपतराय अशा मोठ्या नेत्यांसह तत्कालीन स्वातंत्र्यलढ्यातील ४० हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांनी येथे अनेक सभा घेऊन समाजाला स्वातंत्र्यासाठी संघटित केले. १६ जून १९१८ या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या येथील सभेला अफाट गर्दी झाली होती. या मंडळाने ‘शांताराम चाळीची स्मरणगाथा’ ही माहितीपूर्ण पुस्तिका प्रकाशित केली आहे. यामध्ये प्रारंभीपासून आतापर्यंतच्या कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगांची सचित्र माहिती दिली आहे.
वर्ष १८९५ पासून आजतागायत या मंडळाने परंपरा अखंड चालू ठेवली आहे. लहान मातीची मूर्ती, आकर्षक सजावट आणि पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत येथील रहिवासी आनंदाने उत्सव साजरा करतात. कीर्तन, व्याख्याने यांसह सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून मंडळ स्वत:चे सामाजिक दायित्व सांभाळत आहे. प्रतिवर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार मंडळाकडून करण्यात येतो. यावर्षी वायूदल, सागरीदल आणि लष्कर यांच्या ११ सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
‘गिरगावच्या राजा’चा ८५१ किलोच्या मोदकाचा विक्रम !

‘गिरगावचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘निकदवरी मार्ग सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळा’ने या वर्षी ८५१ किलोचा मोदकाचा नैवेद्य अर्पण करून विक्रम केला आहे. याची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’ने घेतली आहे. या मोदकाच्या प्रसादाचा २० सहस्र गणेशभक्तांना लाभ होणार आहे. या वेळची सजावट पर्यावरणपूरक बांबूपासून केलेली आहे.
मंडळाच्या वतीने या वर्षीपासून रुग्णांना डायलिसीस (डायलिसीस म्हणजे मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया) सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रतिवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते, तसेच अन्य सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंडळ आयोजित करत असते.
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत अनावश्यक व्यय टाळणारे ‘उरणकर वाडी गणेशोत्सव मंडळ’ !

वर्ष १९२६ पासून साधेपणाने, तसेच अनावश्यक व्यय टाळून आणि सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपणारे उरणकर वाडी गणेशोत्सव मंडळाचे हे १०० वे वर्ष आहे. वैद्यकीय शिबीर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा सामाजिक उपक्रमांसह गणेशयाग, भजन, वाडीतील मुलांच्या कलागुणांना चालना देणारे नाटक अशा कार्यक्रमांचे आयोजन यंदाही करण्यात आले आहे.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !