रांजणगाव (पुणे) येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक पार पडली !

मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार

मंदिर महासंघ आढावा बैठक

रांजणगाव (जिल्हा पुणे), २५ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक श्रीक्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिराच्या प्रांगणातील सभागृहात २० ऑगस्ट २०२५ या दिवशी उत्साहात पार पडली. या बैठकीत मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार उपस्थित महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक, मंदिर विश्वस्त, कोअर कमिटी सदस्य, विधी सल्लागार यांनी व्यक्त केला. या वेळी श्रीक्षेत्र रांजणगाव गणपति देवस्थानाचे मुख्य विश्वस्त डॉ. ओंकार महाराज देव, अध्यक्षा सौ. स्वातीताई पाचुंदकर, अमरावती येथील मंदिर कायदे अभ्यासक श्री. अनुप जयस्वाल, ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, पंढरपूर देवस्थान संरक्षक कृती समितीचे अध्यक्ष श्री. गणेश लंके, महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी बार कौन्सिल अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुख, अधिवक्ता प्रवीणचंद जंगले, अधिवक्ता जनार्दन कर्पे, अकोला येथील श्री स्वयंभू महादेव मंदिराचे अध्यक्ष श्री. अरविंद देठे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री महेश पाठक, पराग गोखले, हेमंत सोनवणे, श्रीकांत पिसोळकर, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करतांना डॉ. ओंकार महाराज देव, डावीकडून श्री. मधुकर गवांदे, श्री. सुनील घनवट आणि श्री. दिलीप देशमुख

बैठकीचा आरंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक श्री. संजय जोशी यांनी प्रस्तावना केली. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी मंदिर महासंघाच्या माध्यमातून राबवलेले विविध उपक्रम, दिलेला लढा आणि मिळालेले यश यांविषयी सविस्तर माहिती दिली. भूमाफियांनी शासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून बळकावलेल्या भूमी पुन्हा देवस्थानांना मिळवून देण्यासाठी उभारलेल्या लढ्याविषयी श्री. अनुप जयस्वाल यांनी माहिती दिली. महाराष्ट्रात अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट कायदा करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. श्री. गणेश लंके यांनी पंढरपूर कॉरिडॉरमुळे (कॉरिडॉर म्हणजे सुसज्ज आणि प्रशस्त मार्ग) पंढरपूरचे तीर्थक्षेत्र महात्म्य अल्प होण्याची चिंता व्यक्त केली.

ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी पुण्यातील विविध मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता  (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू करणे, गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, वारीदरम्यान ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून झालेले पत्रक वाटप आणि त्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्याचा यशस्वी निकाल यांसंदर्भातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. दापोली तालुका (जिल्हा रत्नागिरी) संयोजक श्री. रमेश कडू यांनी तालुक्यांमध्ये मंदिर महासंघाच्या कार्याला मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दलचे अनुभव कथन केले.
दुपारच्या सत्रात माजी सह धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी मंदिरांचे व्यवस्थापन पारदर्शक आणि चांगले असेल, तर शासन मंदिर कह्यात घेण्याचा, त्यात हस्तक्षेप करण्याचा विचार करणार नाही, हे शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या सुव्यवस्थापनाचे उदाहरण देऊन स्पष्ट केले.

राज्यस्तरीय मंदिर परिषद आणि कोअर टीम बैठका यांचे नियोजन !

महाराष्ट्र मंदिर महासंघ राज्यस्तरीय कोअर कमिटी

बैठकीत चौथ्या राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेच्या आयोजनासाठी शेगाव, नाशिक आणि गोंदवले ही ठिकाणे सुचवली गेली. पुढील राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक तुळजापूर येथे ऑक्टोबरमध्ये घेण्याचे ठरले. राज्यस्तरीय कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक ३ महिन्यातून एकदा प्रत्यक्ष; तर महिन्यातून एकदा ऑनलाईन घेण्याचे ठरले.

मंदिरांच्या समस्यांबाबत राज्यभर जागृती अभियान

मार्गदर्शन करतांना मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट (डावीकडून तिसरे) आणि उपस्थित अन्य मान्यवर

देवस्थानांच्या भूमी हडपल्या जाऊ नयेत यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ राज्यात लागू व्हावा, मंदिर परिसर ‘मद्य-मांस विक्री’ मुक्त व्हावा, पुरातत्त्व खाते आणि वन खाते यांच्या नियंत्रणाखाली असणार्‍या मंदिरांना येणार्‍या समस्या, अशा विविध सूत्रांविषयी राज्यभर जागृती करण्यात येणार आहे. या विषयी आणि मंदिर महासंघाची संघटनात्मक रचना आणि कार्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोचवण्याच्या दृष्टीने कृती आराखड्याविषयी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

मंदिर महासंघास अधिकृत संघटनेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी केले.

विशेष

१. या बैठकीसाठी सर्व व्यवस्था श्रीक्षेत्र रांजणगाव गणपति देवस्थान ट्रस्टच्या वतीने उत्तमरीतीने करण्यात आली होती.

२. रांजणगाव देवस्थान येथे आलेले प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांनी कोअर टीमच्या सदस्यांची भेट घेऊन चर्चा केली.

३. श्रीक्षेत्र रांजणगाव गणपति देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोअर टीमच्या उपस्थित सर्व सदस्यांचा श्री महागणपतीचे चित्र, श्रीफळ आणि भगवे वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला.

४. बैठकीची सांगता देवतांचे जयजयकार करून करण्यात आली.