रत्नागिरीत नव्या रेल्वे पोलीस ठाण्याचे लोकार्पण !

कोकण रेल्वे मार्गाच्या कायदा-सुव्यवस्थेत होणार वाढ !

रत्नागिरी – शहरात नवीन रेल्वे पोलीस ठाण्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत या ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. आयुक्तालयाचे पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या हस्ते २५ ऑगस्टच्या सकाळी १० वाजता या ठाण्याचे ऑनलाइन उद्घाटन पार पडले.

रेल्वे पोलीस ठाणे उभे करण्यामागील कारण !

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी हे नवीन पोलीस ठाणे चालू केल्याचे पोलीस विभागाने सांगितले.

 उद्घाटनाला उपस्थित मान्यवर !

उद्घाटनप्रसंगी लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त एम्. राकेश कलासागर, ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अन् रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

पोलीस ठाण्याची पार्श्‍वभूमी आणि उद्दिष्टे !

रेल्वे परिसरातील वाढती गर्दी, गुन्हेगारी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाण्याची आवश्यकता होती. हे पहाता अपर पोलीस महासंचालकांनी कोकण रेल्वेसाठी सक्षम पोलीस यंत्रणा सिद्ध करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. यास गेल्या वर्षी ७ ऑगस्टला मान्यता देण्यात आली होती.

रेल्वे पोलीस ठाण्याच्या स्थापनेतून होणार हे लाभ !

१. प्रवाशांना तात्काळ साहाय्य आणि कायदेशीर संरक्षण मिळू शकणार.

२. महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकणार.

३. रेल्वे अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने कारवाई होऊ शकेल.

पोलीस ठाण्याचे हे असणार कार्यक्षेत्र !

रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकूण २७ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यातील प्रमुख स्थानके अशी – कोलाड, माणगाव, खेड, चिपळूण, राजापूर रोड, रत्नागिरी आदी.

पोलीस अधिकार्‍यांची नियुक्ती !

या नवीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रवीण पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यासाठी मंजूर झालेले एकूण मनुष्यबळ १५२ आहे. यात २ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, ६ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ५० प्रमुख हवालदार, ८६ हवालदार आदींचा समावेश असेल. यासाठी ५८ जणांचे स्थानांतर आतापर्यंत करण्यात आले आहे.