मर्दनगड संवर्धन समितीच्या मोहिमेला यश : समितीने श्री गडेश्वरदेवाकडे व्यक्त केली कृतज्ञता !

श्री गडेश्वरदेवाकडे कृतज्ञता व्यक्त करतांना डावीकडून सर्वश्री अभित शिरोडकर, विजयेंद्र नाईक, सुचेंद्र अग्नी, मनोज गावकर, नारायण नाडकर्णी, राजेंद्र देसाई, सत्यविजय नाईक आणि स्वप्निल नाईक

फोंडा, ९ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा सरकारने मर्दनगड संवर्धन समितीच्या मागणीची नोंद घेतल्यामुळे ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता मर्दनगड संवर्धन समितीने ढवळी, फोंडा येथील बस थांब्याजवळील श्री गडेश्वरदेवाला श्रीफळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी मर्दनगड संवर्धन समितीचे सर्वश्री अभित शिरोडकर, विजयेंद्र नाईक, सुचेंद्र अग्नी, मनोज गावकर, नारायण नाडकर्णी, राजेंद्र देसाई, सत्यविजय नाईक आणि स्वप्नील नाईक यांची उपस्थिती होती. सहभागींनी देवतेला पवित्र श्रीफळ आणि फुले अर्पण करून पारंपरिक प्रार्थना केल्या. प्रस्तावित ‘मर्दनगड स्मारक प्रकल्पा’साठी दैवी मार्गदर्शन मागत या मेळाव्यात गोव्याच्या सांस्कृतिक वारशाबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. गोव्यातील परंपरा आणि वारसा यांचा चिरस्थायी दीपस्तंभ म्हणून काम करणार्‍या या महत्त्वपूर्ण स्मारकाची यशस्वी स्थापना सुनिश्चित करणे, हा सामूहिक प्रार्थनेचा उद्देश होता.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यातील हिंदूंना न्याय देण्यासाठी जे कार्य केले आहे, त्याची फोंडा येथील मर्दनगड ही साक्ष आहे. पुरातत्व खात्याने मर्दनगड हे वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करावे आणि मर्दनगडाचे संवर्धन अन् संरक्षण करावे, अशी मागणी फोंडा येथील मर्दनगड संवर्धन समितीने गेले काही दिवस लावून धरली होती. याची नोंद घेत ७ ऑगस्ट या दिवशी गोव्याच्या पुरातत्व खात्याचे मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी मर्दनगड संवर्धन समितीच्या सदस्यांसह मर्दनगडावर जाऊन गडाची पहाणी केली. त्यानंतर ८ ऑगस्टला भाजपचे वास्कोचे आमदार श्री. कृष्णा साळकर यांनी चालू विधानसभा अधिवेशनात ‘ऐतिहासिक मर्दनगडाचे संवर्धन आणि संरक्षण करावे’, अशी मागणी करणारा खासगी ठराव मांडला. या ठरावाला विधानसभेतील सर्व ४० आमदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर फोंडा येथील ऐतिहासिक मर्दनगड ‘वारसा स्थळ’ म्हणून संरक्षित करण्यात येणार आहे. सरकार अर्थसंकल्पात प्रावधान करून मर्दनगडाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता बांधणे, स्वच्छता आदी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी घोषणा पुरातत्व खात्याचे मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी केली.