|

फोंडा, ७ ऑगस्ट – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यातील हिंदूंना न्याय देण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे आणि याचा फोंडा येथील मर्दनगड साक्ष आहे. मर्दनगडासंबंधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, शौर्य यांविषयी पोर्तुगीज दस्तऐवजांमध्ये माहिती उपलब्ध आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वत:हून बांधलेला मर्दनगड हा एकमेव किल्ला आहे. पुरातत्व खात्याने मर्दनगड हे वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करावे आणि मर्दनगडाचे संवर्धन अन् संरक्षण करावे, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. सध्या चालू असलेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ८ ऑगस्ट या दिवशी मर्दनगडाच्या संवर्धनाची मागणी करणारा ठराव वास्कोचे भाजपचे आमदार श्री. कृष्णा साळकर मांडणार आहेत. मर्दनगडाच्या संवर्धनासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, अशी हमी मी देतो. पोतुगिजांनी लिहिलेल्या इतिहासामध्येच मर्दनगड या मराठ्यांच्या किल्ल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे यावर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. गोमंतक ही भोगभूमी नाही, तर ती देवभूमी, तपोभूमी, आध्यात्मिक भूमी आहे, हे आम्हाला सर्वांना सांगायचे आहे, अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी दिली.
मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी ७ ऑगस्ट या दिवशी सकाळी मर्दनगडाला भेट दिली आणि यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या वेळी त्यांच्यासमवेत पुरातत्व खात्याचे संचालक श्री. नीलेश फळदेसाई, इतिहासकार श्री. सचिन मदगे, मर्दनगड संवर्धन समिती, ‘अपरांत अस्मिता’, ‘जगदंब ढोलताशे मंडळ’ आदी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य, वन खात्याचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
मर्दनगडाच्या संवर्धनाची मागणी करणारा ठराव विधानसभेत ८ ऑगस्ट या दिवशी मांडला जाणार असल्याने मर्दनगडाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मंत्री श्री. सुभाष फळदेसाई आणि खात्याचे संचालक श्री. नीलेश फळदेसाई यांनी मर्दनगडाला ही विशेष भेट दिली.
पायी डोंगर चढून मर्दनगडावर गेल्यावर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मर्दनगडाचा राहिलेला बुरुज, श्री गडदेवाचे स्थान असलेले ठिकाण, निशाण बुरुज, विहीर, उद्ध्वस्त झालेली तटबंदी, तसेच अन्य पडलेले गडाचे अवशेष यांविषयीची माहिती इतिहासकार सचिन मदगे आणि इतर यांच्याकडून जाणून घेतली. यानंतर तेथे असलेल्या निशाण बुरुजावर मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी भगवा ध्वज फडकवला.
तत्पूर्वी मर्दनगड संवर्धन समितीचे श्री. मनोज गावकर म्हणाले, ‘‘मर्दनगडाचे संवर्धन व्हावे आणि या किल्ल्याविषयी माहिती सर्वांपर्यंत पोचावी, गोव्यात येणार्या पर्यटकांना या किल्ल्याविषयी माहिती द्यावी, यासाठी समिती प्रयत्नशील आहे.’’
मर्दनगडाविषयी माहिती देतांना इतिहासकार श्री. सचिन मदगे म्हणाले, ‘‘पोर्तुगिजांच्या आक्रमक धोरणाला सडेतोड उत्तर देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज यांनी मर्दनगड बांधला. हा मर्दनगड त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला आहे. दुष्ट शक्तींचे निर्दालन करणारा मर्दनगड हा १७ व्या आणि १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत फोंडा प्रांताची मुख्य राजधानी म्हणून होता. पोर्तुगिजांनी गड उद्ध्वस्त केल्यानंतर इतिहासाच्या पानातून तो दुर्लक्षित झाला होता आणि त्याला पुनर्जीवन देण्यासाठी फोंडा येथील मर्दनगड संवर्धन समिती आणि येथील युवावर्ग प्रयत्नशील आहेत.’’
या वेळी मर्दनगड संवर्धन समितीचे सर्वश्री मनोज गावकर, नीलेश नाईक, सत्यविजय नाईक, राजेंद्र देसाई, स्वप्निल नाईक, सुचेंद्र अग्नी, अभी शिरोडकर, नरेश भाळवे, प्रद्युम्न नाईक, देवदत्त नाईक, गिरीश नाडकर्णी, नाथकिरण देसाई, मोहन नाईक, सुप्रिया केतकर आदींची उपस्थिती होती.
‘स्मार्ट मीटर’मुळे वीजग्राहकांना ९ महिन्यांत १ कोटी ७० लाख रुपये सवलत
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !