साईबाबांच्या ‘डी.एन्.ए.’चे पुरावे द्या ! – साईभक्त गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि नंतर क्षमायाचना

साईबाबांनी एका भक्ताला दिलेल्या चांदीची नाण्यांचे प्रकरण

(डीएन्ए म्हणजे डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड, म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक. जनुकीय घटक (जेनेटिक मटेरियल) ज्यापासून बनतात, ते रेणू म्हणजे डी.एन्.ए.)

अहिल्यानगर – आपल्याकडील साईबाबांची ९ नाणीच खरी आहेत, असा दावा करणार्‍यांनी साईबाबा यांचा ‘डी.एन्.ए.’ आम्हाला दाखवा, असे वादग्रस्त वक्तव्य ‘साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट’चे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केले होते. त्यावरून ग्रामस्थांनी त्यांचा निषेध करत आंदोलन केले. साईबाबा यांच्यासंबंधी ते वक्तव्य अनावधानाने झाले असल्याचे गायकवाड यांनी नंतर सांगितले. ‘त्या नाण्यांचे डी.एन्.ए.चे पुरावे द्यावेत’, असे म्हणायचे होते; पण बोलण्याच्या ओघात साईबाबांचे नाव आल्याचे गायकवाड यांनी सांगत क्षमा मागितली.

गायकवाड यांच्या विरोधात एकवटलेले शिर्डी येथील ग्रामस्थ

साईबाबांनी दिलेली नाणी ही माझ्याकडेच असल्याचा दावाही गायकवाड यांनी केला आहे. साईबाबा यांनी दिलेल्या ९ चांदीच्या नाण्यांवरून शिंदे आणि गायकवाड यांच्यात वाद निर्माण झाला आहे. ‘साईभक्त संजय शिंदे यांच्याकडे असलेली नाणी ही खरी असल्याचे त्यांनी पुरावे द्यावेत’, असेही गायकवाड म्हणाले. साईबाबा यांच्या ‘डी.एन्.ए.’ची चाचणी कशी करावी ? हे पुरातत्व विभागाने ठरवावे. साईबाबांच्या हातातलीच ही नाणी आहेत हे भारत सरकार आणि पुरातत्व विभागाने ठरवावे, असेही वक्तव्य अरुण गायकवाड यांनी केले होते. गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ‘साई संस्थान’ने गायकवाड यांच्याकडील ९ नाणी कह्यात घ्यावीत. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


चांदीच्या ९ नाण्यांचे प्रकरण काय ?

शिर्डी येथील साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवेतील निस्सिम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीची ९ नाणी भेट म्हणून दिली होती. याचा उल्लेख ‘श्रीसाई चरित्रा’मध्ये करण्यात आला आहे. आता त्या नाण्यावरून लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये दावे-प्रतिदावे चालू आहेत.