वारकर्‍यांसाठी सरकार आर्थिक साहाय्य योजना सिद्ध करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

गोवा विधानसभा अधिवेशन

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यातून प्रतिवर्षी ५ सहस्रांहून अधिक वारकरी पंढरपूर येथे पायी जात असतात. वारकरी ‘राम कृष्ण हरि ! …’ असे म्हणत ३७० कि.मी. अंतर १४ ते १५ दिवस पायी पार करत असतात. पेडणे ते काणकोणपर्यंतचे वारकरी यामध्ये सहभागी होतात. प्रतिवर्षी वारकर्‍यांची संख्या वाढत आहे आणि युवावर्गही यामध्ये सहभागी होत आहे. देव, देश आणि धर्म यांकडे युवकांनी वळणे ही एक पुष्कळ चांगली गोष्ट आहे. श्री विठ्ठलावर भक्ती ठेवून वारीवर जाणार्‍यांना साहाय्य करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. यासाठी सरकार लवकरच गोव्यातून पंढरपूर येथे जाणार्‍या वारकर्‍यांसाठी आर्थिक साहाय्य योजना सिद्ध करणार आहे आणि यासाठी अर्थसंकल्पीय प्रावधान केले जाणार आहे. पुढील वर्षी वारकर्‍यांना याचा लाभ होणार आहे, अशी घोषणा मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केली.

मयेचे भाजपचे आमदार प्रमेंद्र शेट यांनी ‘गोव्यातून पंढरपूर येथे जाणार्‍या वारकर्‍यांसाठी सरकारने आर्थिक साहाय्य योजना सिद्ध करावी’, अशी मागणी करणारा खासगी ठराव विधानसभेत मांडला होता. या खासगी ठरावाला डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, केपेचे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकोस्ता, पर्येच्या भाजपच्या आमदार डॉ. दिव्या राणे, मगोपचे आमदार जीत आरोलकर, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे आमदार वीरेश बोरकर, भाजपचे आमदार उल्हास तुयेकर, ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई, काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, भाजपचे आमदार कृष्णा उपाख्य दाजी साळकर, भाजपचे आमदार मायकल लोबो आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी समर्थन दिले. अखेर सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला.

प्रारंभी ठराव मांडतांना आमदार प्रमेंद्र शेट म्हणाले, ‘‘वारकरी पाऊस, ऊन यांची पर्वा न करता श्री विठ्ठलावरील श्रद्धेने वारीवर जात असतात. हा एक शांतीचा मार्ग आहे. आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या दिवशी ही वारी होत असते. वारकर्‍यांचा मार्ग सुकर व्हावा आणि त्यांच्यासाठी आनंदी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी सरकारने वारकर्‍यांसाठी आर्थिक साहाय्य योजना करावी.’’ या वेळी सर्वांनी चर्चेत पुढील सूत्रे मांडली. वारीवर जाणार्‍या वारकर्‍यांसाठी सरकारने निवास आणि शौचालय यांची व्यवस्था करावी. वारकर्‍यांना वाटेत वैद्यकीय साहाय्यही पुरवावे. ही योजना पारदर्शक करावी.

पंढरपूर येथे ‘वारकरी भवन’ उभारणार 

ठरावाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘पंढरपूर येथे गोव्यात आलेल्या वारकर्‍यांसाठी ‘वारकरी भवन’ उभारले जाणार आहे.’’