Foreigner Cleans Himachal Waterfall : विदेशी व्यक्तीने कचरा उचलून भारतियांसमोर ठेवला स्वच्छतेचा आदर्श !

हिमाचल प्रदेश येथील धबधब्याजवळचा प्रसंग

नवी देहली – हिमाचल प्रदेश राज्यातील कांगडा जिल्ह्यात असलेल्या धबधब्याजवळ एका विदेशी पर्यटकाने येथे पडलेले प्लास्टिक आणि कचरा उचलून कचराकुंडीत टाकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, ‘मी प्रतिदिन येथे बसतो आणि लोकांना सांगतो – ‘कचरा उचला आणि परिसर स्वच्छ ठेवा.’ ‘एक्स’वरून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.

या व्हिडिओवर लोकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया अशा !

१. स्वच्छता राखण्याचे दायित्व भारतियांचे असायला हवे; पण ते एक विदेशी व्यक्ती निभावत आहे.

२. ही लाजिरवाणी गोष्ट आहे की, एक विदेशी येथे स्वच्छता करत आहे. आपले लोक मात्र कचरा करत बसतात.

३. ही आपल्या मानसिकतेची समस्या आहे. लोक समजतात स्वच्छता राखणे, हे सरकारचे काम आहे; पण ते प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे.

४. जोपर्यंत आपली विचारसरणी पालटत नाही, तोपर्यंत देश स्वच्छ होणार नाही.

संपादकीय भूमिका

ही गोष्ट भारतियांना लज्जास्पद ! ‘भारतियांनी स्वच्छता राखावी’, असे विदेशी लोकांना सांगावे लागत  असेल, तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठली असू शकेल ?