कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळात ‘जंगली रमी’ खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसारित !

माणिकराव कोकाटे

मुंबई – राज्याचे कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे विधीमंडळामध्ये सभागृहात बसले असतांना ‘जंगली रमी’ खेळत असल्याचा व्हिडिओ शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे. यामुळे सामाजिक माध्यमांसह अनेक नेत्यांकडून माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका होत आहे. याविषयी माणिकराव कोकाटे यांनी ‘मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो. त्या वेळी कनिष्ठ सभागृहात काय चालले आहे, हे पहाण्यासाठी यू ट्यूब उघडत होतो; मात्र तेव्हा विज्ञापन आले. सभागृहात असतांना रमीचे विज्ञापन भ्रमणभाषवर आल्यावर ते ‘स्कीप’ (पुढे ढकलत) करत असतांना २-३ सेकंद लागले. तेवढाच व्हिडिओ दाखवून लक्ष्य करण्यात आले’, असे स्पष्टीकरण दिले आहे.

१. ‘एक्स’ खात्यावर पाठवलेल्या संदेशामध्ये आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपला विचारल्याविना काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असतांना, राज्यात प्रतिदिन ८ शेतकरी आत्महत्या करत असतांनासुद्धा काही कामच नसल्याने कृषीमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.

२. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा, कर्जमाफी यांची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांची ‘कभी गरीब किसानोकीं खेतीपर भी आओ ना महाराज’ (कधी गरीब शेतकर्‍यांच्या शेतावरही या ना महाराज) ही आर्त हाक ऐकू येईल का ?

३. आमदार रोहित पवार यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बाकावर बसलेले दिसत असून त्यांच्या भ्रमणभाषच्या ‘स्क्रीन’वर रमीखेळाप्रमाणे पत्त्याची पाने दिसत आहेत आणि माणिकराव कोकाटे ते वापरत असल्याचे दिसत आहे.

‘जंगली रमी’

४. ‘जंगली रमी’ या खेळावर बंदी आणावी, यासाठी यापूर्वी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत आणि या चर्चेमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी सहभाग घेतला आहे. असे असतांना मंत्री असलेले माणिकराव कोकाटे स्वत: सभागृहात रमी खेळत असल्याचे दिसत असल्यामुळे सामाजिक माध्यमांवरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

सरकारने याविषयी चौकशी करून सत्य समोर आणणे आवश्यक ! यात जर तथ्य असेल, तर कामकाजाच्या वेळी रमी खेळणार्‍या अशा मंत्र्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !