
१. जन्मापासून बालमंदिरात जाईपर्यंतच्या ५ वर्षांत (बाल वयोगटात) आई-वडिलांनी करावयाचे सुसंस्कार आणि त्यांची कर्तव्ये !

अ. बालकाला पाहुण्यांचे आदरातिथ्य करायला शिकवावे.
आ. त्याच्या बालमित्रांकडे लक्ष असू द्यावे. त्यांच्या संगतीने हे बालक अयोग्य कृती करू शकते.
इ. आई-वडिलांचे घरातील वागणे आदर्श असावे. भांडणे, वादविवाद आदी टाळावे. आई-वडिलांनी घरात दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे टाळावे. कार्यक्रम पहायचे असल्यास देवा-धर्माचे संस्कार करणारे निवडक कार्यक्रम त्याला घेऊन पहावे, तसेच त्यातील धार्मिक गोष्टींचा बालकाला भावार्थ सांगावा.
ई. बालकात साधनेची गोडी निर्माण होईल, यासाठी आई-वडिलांनी नित्यनेमाने देवाला प्रार्थना आणि नामजप करण्याकडे, तसेच कृतज्ञता व्यक्त करण्याकडे लक्ष ठेवावे. बालकाकडूनही तसे प्रयत्न करवून घ्यावेत.
उ. देवपूजा करतांना बालकाला मांडीवर घेऊन करावी. त्यामुळे त्याला देवपूजेची आवड निर्माण होईल. तिन्हीसांजेला त्याला घरी येण्यास सांगून त्याच्याकडून हातपाय धुऊन ‘शुभंकरोति’ म्हणवून घ्यावे.
ऊ. बालकाचे हे वय संस्कारक्षम असल्यामुळे धर्माचरणाच्या कृती आई-वडिलांनीही कटाक्षाने कराव्यात, उदा. सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करणे, मोठ्यांच्या पाया पडणे, पुरुषांनी बाहेर पडण्यापूर्वी कपाळावर टिळा लावणे आणि सात्त्विक वेषभूषा करणे इत्यादी.
ए. त्याला देव आणि संत यांच्या गोष्टी अन् त्यांचा भावार्थ सांगून तसे आचरण करण्यासही सांगावे.
ऐ. बालकाचे अनावश्यक लाड करू नये. त्याच्या चुका त्याला दाखवून त्या सुधारायला शिकवावे. तसेच वेळप्रसंगी शिक्षाही करावी.
या ५ वर्षांत बालकाच्या आई-वडिलांनी केवळ ‘पालक’ म्हणून न रहाता त्याचे ‘गुरु’ म्हणून रहावे.
२. ६ ते १२ वर्षे कुमारवयीन गटातील मुलांना घडवण्यासाठी आई-वडिलांनी करावयाच्या गोष्टी !
या वयोगटातील मुलांसाठीही वरील (५ वर्षे वयोगटातील बालकांसंबंधीच्या) सर्व गोष्टी आवश्यक आहेतच. त्यासह पुढील गोष्टीही कराव्यात.
अ. त्याला मराठी बालमंदिरात आणि नंतर मराठी शाळेतच शिक्षणासाठी पाठवावे. घरात बोलतांना मराठीचा वापर अधिकाधिक करावा.
आ. अधेमधे त्याच्या (शाळेतील) मित्रांचे निरीक्षण करून ‘तो त्यांच्यातील काही दुर्गुण घेत नाही ना’, याकडे लक्ष असू द्यावे.
इ. त्याला व्यायामाचे महत्त्व सांगून पालकांनी स्वतः व्यायाम करत त्याच्याकडून व्यायाम करवून घ्यावा.
ई. त्याला मिळालेला खाऊ इतरांना देण्याची सवय लावा.
उ. वेळेचे महत्त्व सांगून प्रत्येक गोष्ट वेळेत करायची सवय लावा.
ऊ. त्याला स्वतंत्र भ्रमणभाष (मोबाईल) घेऊन देऊ नका.
ए. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त तो सात्त्विक वातावरणात राहील, असे नियोजन करावे.
ऐ. त्याच्यात अभ्यासाची आवड निर्माण होईल, असे पहा. त्याच्या अभ्यासाच्या पटलावर श्री गणपति आणि श्री सरस्वती यांची सात्त्विक चित्रे ठेवा, तसेच अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी त्यांच्याकडे पाहून प्रार्थना आणि नामजप करण्याची त्याला सवय लावावी.
ओ. त्याच्या मित्रांपैकी सात्त्विक मित्रांना घरी बोलावून त्यांनाही प्राथमिक साधना सांगून ती करवून घेऊ शकता.
औ. बालकाला सनातनच्या बालसंस्कारवर्गात आवर्जून पाठवावे. आई-वडिलांनी सत्संगाला जातांना शक्य असेल, तेव्हा त्यालाही घेऊन जावे.
अं. सनातनचे ‘बालसंस्कार’ मालिकेतील ग्रंथ त्याला वाचायला द्यावेत.
क. त्याला ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ समजावून सांगून स्वतःतील स्वभावदोषांवर सूचनासत्रे करायला शिकवा.
ख. मुलाच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याचे पुढील शिक्षणक्षेत्र निवडावे.
आई-वडिलांनी कोणत्याही प्रकारच्या वाईट सवयींपासून आणि व्यसनांपासून दूर रहावे, तसेच अध्यात्माची आवड असणारा मित्रपरिवार जोडावा. मुलातील आध्यात्मिक गुण वाढण्यासाठी त्याला जी पथ्ये वर सांगितली आहेत, तीच पथ्ये पालकांसाठीही आहेत.
– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०१५) ॐ
संत कबीर यांच्या उलटबांसिया !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?
भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली पिढी !
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !