आजच्या ‘डिजिटल’ युगात लहान मुलांच्या जीवनात भ्रमणभाष (मोबाईल), दूरचित्रवाणी (टीव्ही), ‘टॅबलेट’, संगणक यांसारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. जेवतांना, मुलांना शांत करण्यासाठी, त्यांचे लक्ष वळवण्यासाठी, उपाहारगृहे अथवा कार्यक्रम आदी ठिकाणी मुलांनी त्रास देऊ नये याकरता, प्रवासात, झोपतांना यांसारख्या वेगवेगळ्या परिस्थितीत पालक मुलांना डिजिटल उपकरणे वापरायला देतात. जगभरात लहान मुलांमध्ये ‘स्क्रीन टाईम’चा (भ्रमणभाष, दूरचित्रवाणी, ‘टॅबलेट’, संगणक बघण्याचा कालावधी) वाढता वापर हा त्यांच्या मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासावर परिणाम करणारा ठरतो. एका अभ्यासातून याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ शहरातील मुलांचा स्क्रीन टाईम अधिक आहे, असे नसून ग्रामीण भागातील मुलांचाही ‘स्क्रीन टाईम’ वाढला आहे, हे विशेष !

या अभ्यासात मुलांचे ७ दिवसांचे निरीक्षण करून ‘स्क्रीन टाईम’ आणि त्याचा मुलांच्या विकासावर होणारा परिणाम अभ्यासला गेला. या अभ्यासानुसार मुलांचा सरासरी ‘स्क्रीन टाईम’ दिवसाला २.३९ घंटे इतका होता, तर ७३ टक्के मुलांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांपेक्षा अधिक ‘स्क्रीन टाईम’ आढळला.
१. अधिक स्क्रीन टाईममुळे मुलांमध्ये बोलण्याची अडचण, संवाद साधण्याची क्षमता न्यून होणे, लहान- मोठ्या हालचाली करण्यात अडचण येणे, सामाजिक संवादात अल्प सहभाग, दैनंदिन कृतींमध्ये अडचणी आदी परिणाम दिसून आले.
२. या अभ्यासानुसार २ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये भाषा विकासासह ग्रहणक्षमता, संवादकौशल्य यांत उणीव दिसून आली, तर २ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांमध्ये विशेषतः भाषिक आणि संवाद क्षमतांमध्ये उणीव आढळण्यासह अन्यही क्षेत्रांमध्ये विकासाची अडचण असल्याचे आढळले.
३. आईचा स्वतःचा स्क्रीन टाईम अधिक असणे, झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर यांमुळेही मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ वाढतो, असे आढळले.
४. ८९ टक्के मुलांना वयाच्या २ वर्षांपूर्वीच स्क्रीनशी ओळख झाली होती, तसेच केवळ ५ टक्के पालकांनी मुलांच्या स्क्रीनच्या वापरावर बंधने घातली होती; मात्र त्यातीलही अनेक पालक ही बंधने पाळू शकले नाहीत.
त्यामुळे पालकांनी २ वर्षांखालील मुलांना कोणतीही डिजिटल उपकरणे वापरायला देणे टाळावे.
संदर्भ : ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’ संकेतस्थळ
संत कबीर यांच्या उलटबांसिया !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?
भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली पिढी !
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !