एका युवकाला मृत्यूच्या छायेतून मुक्त करणारे महायोगी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन

१. शेजार्‍यांनी हुशार आणि अष्टपैलू मुलाचा हेवा करणे

‘आमचे पुण्यातील एक सुखवस्तू कुटुंब आहे. आमचा संसार नीटनेटका आणि सरळ मार्गाने चालला होता. माझा मुलगा बबन महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षाला होता. तो अत्यंत हुशार आणि अष्टपैलू असल्याने त्याचे मित्र त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत. तो गुणवत्ता सूचीत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी अधिकाधिक वेळ अभ्यासाला देत असे; पण हा सर्व उदो उदो होणारा प्रकार आमच्या शेजारी असलेल्या त्याच्या मित्राच्या आई-वडिलांना पहावेना. त्यांचा मुलगा कुमार माझ्या मुलाच्या वर्गातच होता. तो अभ्यासात हुशार नव्हता, तसेच त्याची मित्रमंडळीही अल्प असल्याने आमच्याविषयी त्यांना हेवा वाटत होता. आम्ही कुटुंबीय मात्र शेजारधर्म पाळून होतो.

२. मुलाला रक्ताच्या उलट्या होऊन बेशुद्ध पडणे आणि वाड्यातील मंडळींनी ‘ही अघोरी करणी आहे’, असे सांगणे

एके रात्री धो-धो पाऊस चालू होता. आम्ही घरातील सर्वजण खिडक्या-दारे लावून पांघरूणात गुरफुटून झोपलो होतो. रात्री २.३० वाजता जोराचा वारा आणि विजांचा कडकडाट होऊन गारा पडतात, तसा टपटप आवाज येऊ लागला; म्हणून मी डोक्यावरील पांघरूण काढून उठलो, तर काय ! आमच्या अंथरूणांवर १० – १२ शेंदूर मिश्रित कणकेचे गोळे आणि २ टाचण्या टोचलेले लिंबू पहाताच आम्हाला धस्स झाले. आम्ही सर्वजण उठलो. बबनने ‘‘घाबरू नका, घाबरू नका’’, असे म्हणत त्या सर्व वस्तू जमा करत चपलेने ठेचून गटारात फेकून दिल्या. त्यानंतर त्याला थोड्याच वेळात चक्कर येऊ लागली. आम्ही त्याला लिंबू सरबत दिले. त्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या होऊन तो बेशुद्ध पडला. तेव्हा वाड्यातील बरीच मंडळी जमा झाली आणि ‘‘ही अघोरी करणी आहे’’, असे म्हणू लागली.

३. आधुनिक वैद्यांचे उपचार आणि मांत्रिकांचे उपाय करूनही मुलगा शुद्धीवर न आल्याने त्याला योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याकडे नेणे

आम्ही आधुनिक वैद्यांना बोलावले; पण उपचार करूनही मुलगा शुद्धीवर आला नाही. नंतर काही जणांनी हडपसर येथील २ मांत्रिकांना बोलावून उपाय केले. तेव्हा बबन जरासा शुद्धीवर आला. तेव्हा तो ‘मी आता मरणार’, असे सांगू लागला. त्यानंतर त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. ते त्याला दिले. पुन्हा तो डोळे गोल फिरवून बेशुद्ध पडला. आम्हा सर्वांचेच धाबे दणाणले. आमच्या वाड्यातील अष्टपुत्रे या सद््गृहस्थाने ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या मंत्रसामर्थ्याची प्रचीती’ असे वृत असलेली ‘केसरी आणि नवशक्ती’ या दैनिकातील वृत्तांची कात्रणे दाखवून त्यांचे साहाय्य घेण्याविषयी आम्हाला सुचवले. हे मोलाचे मार्गदर्शन मिळताच आम्ही लगेच टॅक्सी करून कल्याण येथे योगतज्ञ दादाजींच्या घरी गेलो.

४. योगतज्ञ दादाजींनी कुटुंबियांना आधार देऊन मुलासाठी संरक्षककवच देणे आणि आध्यात्मिक उपाय अन् विधी करण्यास सांगणे

आमच्या नशिबानेच म्हणा, योगतज्ञ दादाजी आदल्या दिवशीच तिरुपती येथून घरी आले होते. आम्ही त्यांना घडलेली घटना सांगितली. सर्वप्रथम त्यांनी आमचे आदरातिथ्य करून आम्हाला धीर दिला. त्यानंतर ते आम्हाला त्यांच्या घराजवळच असलेल्या दुर्गाडी खाडीवर घेऊन गेले. तेथे शक्तीदेवतांना आवाहन करून त्यांनी सूक्ष्म परीक्षण केले आणि आम्हाला सांगितले, ‘‘घडलेली घटना काळ्या विद्येची आणि मुलाला धोकादायक ठरणारीच आहे. सबब येथे एक ‘संकटहरण मंत्र’ आणि ‘गायत्रीजप संख्येचे अनुष्ठान’ करण्याचा संकल्प सोडा अन् उद्या गाणगापूरला जाऊन तिथे ७ दिवस राहून संकल्पाप्रमाणे सर्व गोष्टी करा. मी तिथे येईनच. बबन तात्पुरता पूर्ववत होण्यासाठी हे सिद्ध संरक्षककवच घ्या आणि ते बबनच्या अंगावरून दिलेले मंत्र म्हणत फिरवा. त्याला विभूती लावून विष्णुतीर्थ पिण्यास द्या. त्यामुळे तुम्ही गाणगापूर येथे जाऊन अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत बबनला संरक्षण मिळेल. मी इकडून सूक्ष्मातून लक्ष ठेवतोच.’’

५. गाणगापूरला जाऊन योगतज्ञ दादाजींच्या सूचनेप्रमाणे सर्व विधी करणे आणि मुलाची करणीच्या संकटातून मुक्ती होणे

आम्ही पुण्याला घरी जाऊन योगतज्ञ दादाजींच्या सूचनेप्रमाणे उपाय केले. बबन अनुमाने २ घंट्यांनी पूर्ववत् चांगला झाला; पण हा उपाय १० दिवसांसाठी मर्यादित होता. बबनच्या प्रकृतीत २ घंट्यांत झालेल्या सुधारणेमुळे आमचा विश्वास बसला. दुसर्‍या दिवशी आम्ही गाणगापूरला गेलो. योगतज्ञ दादाजींनी सांगितलेले सर्व विधी ब्रह्मवृंदांच्या साहाय्याने पूर्ण केले. या सर्व कार्यवाहीत जलजप अनुष्ठानाचा मोठा भाग होता. ही जलजप अनुष्ठाने आम्ही आमच्या हितचिंतकाच्या साहाय्याने पूर्ण केली आणि पुण्याला परत आलो. दुसर्‍या दिवशी सकाळी ‘देवापुढे एक नारळ आणि त्यावर एक जास्वंदीचे फूल’, असे अकल्पितपणे प्रकटले. ते पाहून आम्हाला हा संकट मुक्ती झाल्याचा संकेत असल्याची निश्चिती पटली.

६. उंदराने करणी करणार्‍या शेजार्‍यांना चावून अद्दल घडवणे आणि शेजार्‍यांनी क्षमा मागून योगतज्ञ दादाजींना नमस्कार सांगणे

तिसर्‍या दिवशी २ आडदांड अनोळखी पुरुष एक चिठ्ठी घेऊन आले आणि म्हणाले, ‘‘तुमच्यावर ज्यांनी हे संकट आणले होते, त्यांनी ही चिठ्ठी दिली आहे. त्यांना क्षमा करा. त्यांना काल रात्री पश्चाताप झाला आहे. त्यांच्या घरात उंदरांचा वावर नसतांनाही बाहेर कोठून तरी उंदीर येऊन त्यांना कडकडून चावला आणि रक्त काढले. त्यांना ही अद्दलच घडवली म्हणा ना !’’ चिठ्ठी हिंदीमध्ये होती. त्यातील लिखाणाचा सारांश पुढीलप्रमाणे होता. ‘आम्ही आपल्यावर जीवघेणे आसुरी कृत्य केले’, त्याबद्दल आम्हा सर्वांना क्षमा करा आणि तुमच्यावरील हे संकट नष्ट करणार्‍या बाबांना आमचा सलाम सांगा.’

ते दोघेजण चिठ्ठी देऊन परत जायला निघाले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘यापुढे अशी कृत्ये करू नका’, असे या मंडळींना सांगा.’’ तेव्हा तोंडावर हात ठेवून ते म्हणाले, ‘‘बोलू नका, तुमच्या शेजार्‍यांनीच अघोरी कृत्य करणार्‍या मंडळींना पैसे देऊन सुपारी दिली होती. जर आपण दैवी उपाययोजना केली नसती, तर तुमचा मुलगा तुम्हाला नक्कीच मिळाला नसता.’’ त्यानंतर ते निघून गेले.

मुलाला मृत्यूच्या छायेतून सोडवणारे दीनदयाळू, कृपासागर आणि महायोगी प.पू. दादाजींना आमचे शतश: प्रणाम !’

– श्रीराम कर्वे, पुणे (साभार : त्रैमासिक ‘गुरुभक्ती’, वर्ष १९८८)