आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलभक्तीचा जागर करणार्या या लेखात भक्त पुंडलिकाने केलेली अद्वितीय विठ्ठलभक्ती, वारकर्यांना प्रत्येक वर्षी विठ्ठलदर्शनाची लागलेली आस आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा भावार्थ यांविषयी जाणून घेऊया.

१. ईश्वराच्या रूपांची मनापासून केलेली भक्ती त्याच्या चरणांपाशी लीन होत असणे
अखिल विश्वात एकच शक्ती व्यापलेली आहे, ती म्हणजे ईश्वर ! या शक्तीची प्रचीती आपण नेहमीच घेतो. या ईश्वरी शक्तीला आपण ज्या ज्या रूपात आपल्या दृष्टीने पहातो, त्या त्या रूपात ती आपल्याला दिसते. कुणाला देव निसर्गात दिसतो, तर कुणाला झाडांत, पानांत किंवा प्राण्यांत दिसतो. कुणाला आपल्या आवडत्या व्यक्तीत दिसतो, तर कुणाला दगडातही देव दिसतो. जिथे जिथे आपली भक्ती आहे, प्रेम आहे, तिथे तिथे आपल्याला त्या त्या स्वरूपात भगवंत दिसत असतो. तो सगुण आहे आणि निर्गुणही आहे. या भगवंताची अनेक रूपे आहेत; परंतु ईश्वर एकच आहे. असे म्हणतात की, तुम्ही कुणाचीही मनापासून भक्ती केली, तर ती ईश्वरचरणी लीन होते.

२. भक्त पुंडलिकाने केलेली अद्वितीय विठ्ठलभक्ती आणि त्याच्या भेटीची वाट पहात विटेवर उभा असलेला श्री विठ्ठल !
भारताची ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्या पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे मंदिर आहे. भक्त पुंडलिकाच्या भेटीला स्वत: श्री विठ्ठल आला होता; परंतु स्वतःचे माता-पिता यांच्या सेवेत पुंडलिक इतका तल्लीन झाला होता की, साक्षात् श्री विठ्ठल आपल्या भेटीस आला आहे, याची त्याला जाणीवही झाली नाही. देव साक्षात् भेटीला आला असला, तरी पुंडलिकाने त्याच्या माता-पित्याच्या सेवेत खंड पडू नये; म्हणून श्री विठ्ठलाकडे जवळच असलेली एक वीट भिरकावली आणि त्याला त्यावर उभे रहाण्यास सांगितले. पुंडलिकाच्या भेटीची वाट पहात श्री विठ्ठल त्याच विटेवर उभा राहिला, तो आजतागायत तिथेच उभा आहे, अशी आख्यायिका आहे.

३. संतजनांप्रमाणे भक्तजनांनाही लागलेली विठ्ठलाच्या भेटीची आस !
सगुण-निर्गुण यांचा अवतार असलेल्या या विठ्ठलाच्या भेटीची आस केवळ संतजनांना नाही, तर ईश्वराच्या भक्तीत लीन झालेल्या समस्त भक्तजनांना आहे. प्रत्येक वर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वेगवेगळ्या भागांतून अनेक वारकरी चालत पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. या भेटीची त्यांना वर्षभर सतत आस लागलेली असते.
४. अभंग आणि त्याचा भावार्थ
भक्तांना विठ्ठलाच्या भेटीची जी आस लागते, तिचे वर्णन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या ‘भेटीलागीं जीवा, लागलीसे आस’ या अभंगात केले आहे, त्याला तोड नाही !
संत तुकाराम महाराज त्यांच्या ११३६ व्या अभंगात म्हणतात…
अ. भेटीलागीं जीवा, लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।। धृ. ।।
भावार्थ : संत तुकाराम महाराज विठ्ठलाची आळवणी करतांना म्हणतात, ‘हे विठूमाऊली, माझ्या मनाला तुझ्या भेटीची (दर्शनाची) तीव्र ओढ लागली आहे. रात्रंदिवस सतत मी तुझी वाट पहात आहे.
आ. पूर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन ।
तैसें माझें मन वाट पाहे ।। १ ।।
भावार्थ : चंद्र आणि चकोर पक्षी यांचे एकमेकांप्रती असलेले आकर्षण हे प्रेम अन् निष्ठा यांचे द्योतक आहे. चंद्र हेच त्या चकोर पक्षाचे जीवन असून त्याचाच ध्यास चकोर पक्षाला लागलेला असतो. हे विठ्ठला ! मलाही असाच तुझा ध्यास लागलेला आहे.
इ. दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली ।
पाहतसे वाटुली पंढरीची ।। २ ।।
भावार्थ : सासरी गेलेल्या लेकीला स्वत:चा संसार सांभाळत असतांनाच माहेरी परतण्याची ओढ असते. दिवाळी सणाच्या निमिताने तिला माहेरी येण्याची संधी मिळत असते. त्यामुळे तिला दिवाळीचा सण कधी येतो, याची आस लागली आहे. याचे उदाहरण देतांना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘प्रपंचात राहून दायित्व सांभाळतांना आपल्याला श्री विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली आहे. हे विठ्ठला, तू माझे माहेर आहेस. पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पहात आहे.’
ई. भुकेलिया बाळ अति शोक करी ।
वाट पाहे परि माऊलीची ।। ३ ।।
भावार्थ : बाळाला जेव्हा भूक लागते, तेव्हा ते आक्रोश करते; कारण त्याला त्याची आई हवी असते, जी येऊन त्याची भूक शांत करू शकेल. त्यासाठी बाळ त्याच्या आईची वाट अगदी आतुरतेने पहात असते. बाळाचा हा आक्रोश केवळ त्याच्या आईसाठीच असतो; कारण केवळ त्या बाळाची आईच त्याची भूक शांत करू शकते. संत तुकाराम महाराज याचे उदाहरण देऊन श्री विठ्ठलाला म्हणतात, ‘हे माऊली, भुकेलेले बाळ जसे आईसाठी शोक करत आहे, तसाच मी तुझ्या दर्शनासाठी भुकेलेला आहे आणि तुझ्याच भेटीसाठी आतुरलेलो आहे. बाळाला जशी आईच्या प्रेमाची भूक लागली आहे आणि ते आईसाठी व्याकुळलेले आहे, तशीच भूक मला तुझ्या दर्शनाची लागलेली आहे. तू माझी माऊली (आई) आणि मी तुझे बाळ आहे. विठ्ठलरूपी मातेची मी मनापासून वाट पहात आहे.’
उ. तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
धांवूनि श्रीमुख दावीं देवा ।। ४ ।।
भावार्थ : हे विठ्ठला, तुझ्या भेटीसाठी, तुझ्या एका दर्शनासाठी माझा जीव तळमळत आहे. केवळ आणि केवळ तुझ्या भेटीची आस लागलेली आहे. हे विठ्ठला ! तुझे दर्शन मला कधी होईल ?
तुझ्याच दर्शनाची भूक आम्हाला लागलेली आहे. आता धावत ये आणि तुझे हे सुंदर रूप आम्हाला दाखव !
विठ्ठल विठ्ठल !
– कविता आमोणकर
(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २१.६.२०२५)
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकांनो, देवाने दिलेल्या देहरूपी देणगीचा साधनेसाठी उपयोग करून नरदेहाचे सार्थक करा !