BJP MLA Raja Singh Resigns : आमदार टी. राजा सिंह यांच्याकडून भाजपचे त्यागपत्र

टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी पक्षाचे त्यागपत्र दिले आहे. त्यांनी त्यांचे त्यागपत्र प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांना पाठवले आहे.

भाजपचे स्थानिक नेते रामचंद्र राव यांना तेलंगाणाचे प्रदेशाध्यक्ष केले जात असल्याचे कारण देत त्यागपत्र देत असल्याचे सिंह यांनी सांगितले. असे असले, तरी हिंदुत्व, राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतच राहीन, असेही सिंह यांनी नमूद केले.

यापूर्वी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित विधानावरून टी. राजा सिंह यांनी त्यांचे समर्थन केले होते. त्यामुळे भाजपने त्यांना पक्षातून काढून टाकले होते; मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले होते.