
पुणे – पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार्या वारीत शिरून वारकर्यांचे धर्मांतर करणार्या ख्रिस्ती प्रचारकांच्या विरोधात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’द्वारे पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने चिंतामणी प्रासादिक दिंडीचे सचिव ह.भ.प. दत्तात्रय महाराज चोरघे यांनी २२ जून या दिवशी वानवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या वेळी त्यांच्यासमवेत ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे जिल्हा संयोजक श्री. सचिन घुले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शुभम डोणावडे, शशांक सोनवणे आणि हिंदु धर्मप्रेमी श्री. शिवराज डोणावडे हे उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील फातिमानगर येथे काही महिला पंढरपूरला निघालेल्या दिंडीतील वारकर्यांना बायबलमधील पत्रकांचे वितरण करत होत्या. वारीत सहभागी वारकरी आणि दिंडी पहाण्यासाठी आलेले हिंदु भाविक यांना ही पत्रके देऊन त्यांना येशूची उपासना करण्याचे आवाहन या ख्रिस्ती प्रचारक महिला करत होत्या. या पत्रकांमध्ये ‘येशूच तारणहार आहे’, ‘येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे’, असा मजकूर लिहिण्यात आला होता. या पत्रकात व्यसनमुक्तीही करण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन करून त्यावर मोबाईल क्रमांकही देण्यात आले होते. मूळात व्यसनमुक्तीच्या पत्रकांवर येशू ख्रिस्ताची उपासना करण्याचे आवाहन करणार्या लिखाणाची आवश्यकता काय ? श्री विठ्ठलाची भक्ती करणार्या आणि हिंदु धर्मशास्त्रानुसार उपासना करणार्या वारकर्यांना बायबलमधील लिखाण असलेल्या पत्रकांचे वितरण कशासाठी ? हा सर्व प्रकार धर्मांतरासाठीच असल्याचे यातून स्पष्ट होते.
अशा प्रकारे वारीसारख्या हिंदूंच्या पवित्र सोहळ्याच्या वेळी आणि सार्वजनिक ठिकाणी धर्मांतरप्रवण कृत्य करणे हा हिंदू समाजाच्या श्रद्धेवर घाला आहे. कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे. हा ‘भारतीय दंड संहिता’ आणि ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२३’ अंतर्गत गुन्हा ठरतो. यांवर ‘कलम २९५ अ – धार्मिक भावना दुखावणे’, ‘कलम १५३ अ – धार्मिक द्वेष पसरवणे, ‘कलम २९८ – अपमानजनक उद्देशाने धर्मसंबंधी वक्तव्य’, ‘कलम ५०५ (२) – धार्मिक समुदायांत शत्रुता निर्माण करणे’, तसेच ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२३ – फसवणूक, दबावाद्वारे धर्मांतराचा प्रयत्न’ या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, असे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’द्वारे पोलिसांत केल्या गेलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या मागण्या !
१. दोषींवर तात्काळ गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात यावी.
२. पत्रकांवरील मोबाईल नंबरवरून त्यांच्या नेटवर्कचा शोध घेऊन अन्वेषण करण्यात यावे.
३. पालखी मार्गावर धर्मांतरविषयक प्रचारावर बंदी घालण्यात यावी आणि पोलीस बंदोबस्त वाढवावा.
