नेरूर येथील विनामूल्य आयुर्वेदिक उपचार शिबिराचा ४१० जणांनी घेतला लाभ

कुडाळ – आजच्या पालटत्या जीवनशैलीमध्ये आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती एक सुंदर पर्याय आहे. कारण त्या उपचारांचे विपरीत परिणाम आपल्या शरिरावर होत नाहीत. आपली ध्येये गाठायची असतील, तर निरोगी आयुष्य हे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धतीचा स्वीकार करा, असे आवाहन साहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. अवंतिका कुलकर्णी यांनी काढले.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा आणि कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय आणि संशोधन केंद्र नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच बॅरिस्टर नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, तसेच बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या सहकार्याने नेरूर येथे विनामूल्य आयुर्वेदिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून एकूण ४१० रुग्णांनी त्याचा लाभ घेतला.
या वेळी व्यासपिठावर राष्ट्रीय आयुर्वेदगुरु तथा पंचकर्म निष्णात चिकित्सक वैद्य मुरलीधर प्रभूदेसाई, डॉ. माधुरी प्रभूदेसाई , डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. प्रवीण भट, डॉ. दत्तप्रसाद पवार, डॉ. अंकिता मसुरकर, डॉ. स्वाती पटेल, डॉ. नितेश हुकरे, न्यायाधीश गजानन कुलकर्णी आदी उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून आणि धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलतांना सौ. अवंतिका कुलकर्णी पुढे म्हणाल्या, ‘‘जीवनामध्ये आयुर्वेदाची कास धरल्यास अधिक काळ निरोगी राहू शकतो. अशा प्रकारे विनामूल्य आयुर्वेदिक उपचार महाशिबिराचे आयोजन करणे हा एक महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम आहे.’’
या महाशिबिराचे उद्घाटक तथा प्रमुख अतिथी डॉ. मुरलीधर प्रभूदेसाई म्हणाले, ‘‘भारताला भूषणावह असणारी आयुर्वेद परंपरा माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती महत्त्वपूर्ण असल्याचे आता जगाला पटले आहे. जग त्याचा पाठपुरावा करत आहे. लोकांना निरोगी आणि वेदना विरहित जीवन जगण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरचे आयोजन करणे हा एक उत्तम सामाजिक जाणीव जागृतीचा उपक्रम आहे.’’
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !