‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त पार पडले ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ सत्र
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी, १८ मे (वार्ता.) – हिंदूंवर झालेल्या अनेक आघातांविषयीचे खटले अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. या खटल्यांचे निर्णय व्हायला किती वेळ लागणार, हे आपल्या सर्वांना ठरवायचे आहे. आज देशातील व्यवस्था हिंदुविरोधी आहे. वक्फ बोर्डविषयी जेव्हा संसदेत कायदा पारित झाला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात याविरोधात प्रविष्ट झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय विचार करते की, हा कायदा कसा थांबवला जाईल; परंतु संसदेने पारित केलेला कायदा थांबवताच येत नाही. या सर्व घटनांमुळे असे लक्षात येते की, केवळ कायदेच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थाच हिंदुविरोधी असल्याने ती पालटायला हवी, असे प्रखर उद्गार ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी काढले. १८ मे या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या दुसर्या दिवशी ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ हा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. या वेळी व्यासपिठावर केंद्रीय सूचना विभागाचे माजी आयुक्त आणि ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे संयोजक श्री. उदय माहुरकर, ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड ॲनालिसिस’चे अध्यक्ष श्री. नीरज अत्री, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हेही उपस्थित होते.
अधिवक्ता विष्णु शंकर जैन पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंच्या विरोधात नकळतपणे प्रचंड कायदे निर्माण केले गेले आहेत. राज्यघटनेतील कलम २९-३० मध्ये अनेक असंवैधानिक त्रुटी आहेत. कलम ३० चा दुरुपयोग केला जात आहे. कलम २६ प्रमाणे मशिदी, चर्च मात्र सरकारी अधिग्रहणापासून सुटतात; मात्र हिंदूंची मंदिरे सरकारी अधिग्रहण होतांना हेच कलम बाजूला केले जाते. शिवाचे मंदिर पाडण्याचे आदेश देतांना देहली उच्च न्यायालय म्हणते की, भगवान शिवाने आम्हाला क्षमा करावी ! हिंदु समाजानेही या लढ्यासाठी दबावगट निर्माण केला, तरच आपण हिंदु मंदिरे सुरक्षित ठेवू शकतो. त्याचसमवेत हिंदुविरोधी कायदे असल्याने आपली कुचंबणा होत आहे. निधर्मी, समाजवादी यांची व्याख्या न्यायाधिशांनाही व्यवस्थित ठाऊक नाही. अल्पसंख्यांक आयोग असंवैधानिक असूनही त्याविषयी कुणीही समजून घेत नाही, ही शोकांतिका आहे. आज देशातील सहस्रो अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये दिलेल्या सुविधा मिळवण्यासाठी लोक धर्मपरिवर्तन करून तेथे प्रवेश घेत आहेत. देहली सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या घरात मोठी रक्कम सापडते; पण याविषयी एक साधी तक्रार प्रविष्ट होत नाही. ते त्यागपत्र देत नाहीत. चौकशी समिती अयशस्वी होते. ते न्यायाधीश स्वतः म्हणतात की, मी न्यायाधिशाचे पद सोडणार नाही. असे न्यायाधीश असतील, तर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते कसे लढू शकतील ? आपले हिंदु राष्ट्र शस्त्रसंधी करणारे नाही, तर पाक, बांगलादेश, अफगाणसह अखंड हिंदु राष्ट्र निर्माण करणारे सनातन राष्ट्र असावे. आपण हिंदु आपल्या श्रद्धा केंद्रांसाठी अतिशय सहिष्णू, शांत आहोत. ‘आपली श्रद्धा केंद्रे मुक्त व्हायला हवीत’, अशी एकमुखी मागणी सर्व हिंदूंनी करायला हवी.’’
समस्त हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मी आभार मानतो ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात कालपासून मला अनुभूती होत आहे की, गोमंतकीय भूमीत हिंदु राष्ट्राचा इतिहास लिहिला जात आहे आणि हे खरोखर संस्मरणीय आहे. समस्त हिंदु समाजाच्या वतीने आम्ही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी केलेल्या आदर्श नियोजनासाठी धन्यवाद देत आहेत. आम्ही वर्ष २०१३ मध्ये अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात आलो होतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे आमचे गुरु असून त्यांचे आम्हाला आशीर्वाद लाभले आहेत. त्यांच्यामुळे आमच्या जीवनात मोठे पालट घडले आहेत. एक नवी ऊर्जा आम्हाला अयोध्या, काशी, मथुरा, ज्ञानवापी, संभल या न्यायालयीन लढाईत मिळत आहे. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहोत. आम्हा हिंदुत्वनिष्ठांचा हा लढा आज प्रचंड व्यापक झाला आहे तो गुरुदेवांच्या आशीर्वादामुळेच ! सनातन संस्था, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या संस्था पुढे जाऊन मोठी आध्यात्मिक केंद्रे होतील. समस्त हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मी आभार मानतो.
सांस्कृतिक आक्रमण आणि संस्कृती हनन करणारे यांवर कठोर निर्बंध आणायला हवेत ! – उदय माहुरकर, संयोजक, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’

देशावरील सांस्कृतिक आक्रमण हे सर्वांत मोठे संकट आहे. सामाजिक माध्यमे, ‘ओटीटी’, ‘पोर्नोग्राफी’ (अश्लीलता) यांसारख्या माध्यमांतून अश्लील चलचित्रे दाखवली जातात आणि हिंदु संस्कृतीवर थेट आक्रमण केले जात आहे. अशा गोष्टी सिद्ध करणारे लोक बलात्कारालाच प्रोत्साहन देत आहेत. देशात ८० टक्के बलात्कार हे अश्लील चलचित्रे पाहून होत आहेत. या सर्व माध्यमांच्या विरोधात मी देहली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती; परंतु प्रथमदर्शी अहवाल नोंद केला नाही. संस्कृती हननाचे प्रमाण पुष्कळ गतीने वाढत आहे. सांस्कृतिक आक्रमण परतवून लावण्यासाठी संस्कृती हनन करणार्यांवर कठोर निर्बंध आणायला हवते. आमची मागणी आहे की,
अ. ‘इंडिसेन्ट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन्स ॲक्ट’च्या अंतर्गत ३ वर्षांऐवजी १० वर्षांची शिक्षा करावी अन् ३ वर्षांपर्यंत जामीन दिला जाऊ नये. ३ वर्षे जामीन न मिळणे, हा आतंकवाद्यांसाठी केलेला नियम आहे आणि हा नियम या सांस्कृतिक आतंकवाद्यांना लावायलाच हवा.
आ. ‘लॉ ऑफ एथिक्स कोड’ सिद्ध करून चित्रपट, चलचित्रे यांतील दृश्य, विषय, कपडे आणि भाषा यांवर मर्यादा असावी अन् ही मर्यादा ओलांडल्यास १० ते २० वर्षांची शिक्षा केली जावी.
अनेक संतांनी ‘भारत देश महान राष्ट्र बनेल’, अशी भविष्यवाणी केली आहे. जर या कार्यात काही अडचणी येत असतील, तर आपण त्या पुढाकार घेऊन थांबवायला हव्यात. ही लढाई आपण निश्चित जिंकणार !
सत्यनिष्ठ हिंदुत्वनिष्ठ संघटना म्हणजे ‘सनातन संस्था’ ! – श्री. उदय माहुरकरसनातन संस्था ही संस्कार सिंचनाचे कार्य करत आहे. वर्ष २०१८ मध्ये काही धर्मांधांनी ‘सनातन संस्थेवर बंदी आणावी’, अशी मागणी केली. संस्थेचे कार्य मी जवळून पाहिले असल्याने ‘इंडिया टुडे’ उपसंपादक असतांना मी सनातन संस्थेच्या समर्थनार्थ लेख लिहिला. त्यातून मी असे सांगितले, ‘बंदी आणायची असेल, तर तबलिगी जमात, देवबंद यांसारख्या मशिदी यांवर बंदी आणावी.’ सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, म्हणजे कलियुगातील सात्त्विक लोकांचे एकत्रीकरण आहे ! |
भारत फोफावत चाललेला काल्पनिक ख्रिस्ती प्रसार रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण लढा आवश्यक ! – नीरज अत्री, अध्यक्ष, नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड ॲनालिसिस

हिंदूंसमोर जसे जिहादींचे संकट आहे, त्यापेक्षा मोठे संकट ख्रिस्ती पंथाने रचले आहे. त्यांचे धर्मांतराचे कार्य अतिशय धोकादायक आहे; पण ते वरकरणी दिसून येत नाही. ख्रिस्ती पंथाने जगाला गेली २०२५ वर्षे जगाला मूर्ख बनवले. अस्तित्वात नसलेल्या येशूला क्रॉसवर चढवल्याची कपोलकल्पित कथा सांगितली. याच कथेला अनुसरून नाताळ, ईस्टर यांसारखे सण साजरे करण्याची प्रथा पाडली; पण कुणीही सदा सर्वकाळ सर्वांना मूर्ख बनवू शकत नाही. आता जगाला हे सत्य सांगण्याची वेळ आली आहे. जो देश नेहमी सत्याचा शोध घेतो, अनुभवसिद्ध ज्ञानाला अधिक महत्त्व देतो, त्या देशात केवळ एकाच पुस्तकातील माहिती सत्य असल्याचे सांगून परिवर्तन केले जात आहे. ख्रिस्ती पंथ हा असत्यावर आधारीत आहे. हे पश्चिमी देशातील बहुतांश इतिहास संशोधकांनी सप्रमाण स्पष्ट केले आहे. येशूला क्रॉसवर चढवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला; पण ३ दिवसांनी तो पुन्हा जिवंत झाला. अशा काल्पनिक कथा सांगून नाताळ साजरा करण्याची प्रथा या देशात पाडण्यात आली.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव भगवान परशुरामाचे कार्य करत आहेत ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या भव्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा सनातन राष्ट्राचा शंखनाद आहे. या टप्प्यापर्यंत पोचण्यासाठी सनातनला अनेक दिव्यातून जावे लागले. अनेक विरोधक आणि मोठमोठ्या अन्वेषण यंत्रणा यांनी सनातन संस्थेला संपवण्याचा प्रयत्न केला, तरीही सनातन संस्था संपली नाहीच; पण तीच संस्था आज सनातन राष्ट्राचा शंखनाद करत आहे; कारण संस्थेवर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे. गोवा ही भगवान परशुराम भूमी आहे. भगवान परशुरामाचे कार्य आज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी २५ वर्षांपूर्वी सनातन संस्थेचे बीज रोवले होते. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे, ज्याचे विराट स्वरूप आज या कार्यक्रमाच्या रूपाने आपल्या समोर दिसत आहे. सनातनच्या प्रत्येक साधकामध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम रोमारोमांत भिनवले आहे. आपण केवळ श्रीरामसेनेतील एक वानर आणि खार बनून स्वतःचा लहानसा वाटा उचलत आहोत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना मूर्तीकाराप्रमाणे घडवून देवाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
परशुराम भूमीत झालेल्या शंखनादाने सनातन राष्ट्र निश्चित येईल ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

बांगलादेशात शेख हसिना सरकारविरोधी आंदोलनात हिंदूंनाच मारण्यात आले. काश्मीर, केरळ आणि बंगाल येथून हिंदूच संपत चालले आहेत. कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना निवडून ठार मारले जात आहे. नुकत्याच पहलगाम येथेही झालेल्या आक्रमणात धर्म विचारून हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. बहुसंख्यांक असलेले हिंदू मार खाणारा भारत एकमात्र देश बनला असतांना हिंदु मात्र केवळ जागृती करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे आता केवळ जागृती करत बसण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे समर्थ रामदासस्वामींनी जनजागृती करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यात समाजाला सहभागी केले, त्याचप्रमाणे आज संत जागृती करत असल्याने आपल्यालाही या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या माध्यमातून सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढण्यासाठी सिद्ध व्हावे लागेल. रामेश्वरममध्ये शंखनाद झाला, तेव्हा लंकादहन निश्चित झाले; जेव्हा हा शंखनाद कुरुक्षेत्रामध्ये झाला, तेव्हा कौरवांचा संहार निश्चित झाला; जेव्हा हा शंखनाद छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला, तेव्हा हिंदवी स्वराज्य साकार झाले. आता हाच शंखनाद परशुरामभूमीत झाला, तर सनातन राष्ट्र निश्चितच येईल.
यापुढे केशरी रंग केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण विश्वभरात दिसणार ! – विनायक शानबाग, सनातन संस्था‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांनी परिधान केला होता केशरी रंगाचा पोषाख !केशरी रंग त्रेता आणि द्वापर या युगांशी संबंधित आहे. तो हनुमानाशी निगडित आहे. हनुमान स्वत: रामभक्त होते. त्यांच्यात दास्यभाव आणि वीरभाव आहे. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज हे दोन्ही रंग ज्यामध्ये आहे, तो केशरी रंग आहे. आज महोत्सवात उपस्थित सर्वांनी केशरी रंगाचा पोषाख परिधान केला आहे. हा दैवी संकेत आहे. यापुढे केशरी रंग केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण विश्वभरात दिसणार आहे. |
‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या मराठी भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन !‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वश्री नीरज अत्री, उदय माहूरकर, रमेश शिंदे, अभय वर्तक यांच्या हस्ते ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, या मराठी ‘ई-बुक’चे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक ‘ॲमेझॉन किंडल’वर उपलब्ध असणार आहे. |
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या दुसर्या दिवशी श्रीरामनामाचा १ कोटीचा संकल्प पूर्ण !सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव या दुग्धशर्करायोगाच्या निमित्ताने फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी मैदानावर भव्य आणि दिव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात पार पडत आहे. या महोत्सवाच्या पहिल्या आणि दुसर्या दिवशी श्रीरामनाम जपयज्ञ पार पडला. या वेळी ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा नामजप उपस्थित साधक, हिंदुत्वनिष्ठ आणि उपस्थित सर्वांनी भावपूर्णपणे केला. ‘भारतात लवकरात लवकर रामराज्य यावे’, या संकल्पाने १ कोटी श्रीरामनाम जपयज्ञ पूर्ण झाला. या नामजपामुळे महोत्सवाचा संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला. |