पुणे येथील उद्योजकाची सायबर चोरांकडून बिहारमध्ये हत्या, १५ आरोपी अटकेत !

मृत लक्ष्मण शिंदे

पुणे – झारखंडमधील मोठी ऑर्डर देतो, असे आमीष दाखवून सायबर चोरांनी पुणे येथील उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना बिहारमधील पाटणा शहराजवळील जहानाबाद येथे बोलावले. त्यांना शेतात नेऊन पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांची निर्घृण हत्या केली. बिहार आणि पुणे पोलिसांनी या प्रकरणात १५ जणांना अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी शिंदे यांना शिवराज सागी नावाच्या व्यक्तीने ई-मेलद्वारे संपर्क साधला. आमच्याकडे तुमच्यासाठी १०० कोटींची ऑर्डर आहे. कामाची प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी बिहारमध्ये यावे लागेल, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून ११ मार्चला शिंदे हे विमानाने पाटणा येथे गेले. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. त्यांच्या कुटुंबियांनी कोथरूड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर महिनाभराने म्हणजे १४ एप्रिलला त्यांचा मृतदेह जहानाबाद येथे घोसी पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळला. २ दिवसांपूर्वी त्यांची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शिंदेंचे पाटणा विमानतळाबाहेरूनच अपहरण झाले. आरोपींनी शिंदेंच्या बँक खात्यातून ९० सहस्र रुपये काढून घेतल्याचे दिसते, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.