‘१८.२.२०२५ या दिवशी श्री. दामोदर गायकवाड (वय ५१ वर्षे) आणि त्यांच्या पत्नी सौ. मनीषा गायकवाड (वय ४४ वर्षे) यांच्या समवेत मी एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलो होतो. दुसर्या दिवशी मी दोघांना विचारले, ‘‘आपण एकत्र असतांना माझ्या लक्षात आले की, तुम्ही दोघे एकमेकांशी आदराने बोलत आहात. तुमचे कुठल्याही प्रसंगात मतभेद दिसले नाहीत किंवा एखादे भांडणही झाले नाही. पती-पत्नींमध्ये असे बहुतेक वेळा दिसून येत नाही. यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता ?’’

१. पती-पत्नींनी एकमेकांना समजून घेणे

त्यावर दामोदरदादा म्हणाले, ‘‘माझ्याकडून काही चूक झाली, तर मी पत्नीची क्षमा मागतो. मी तिच्याशी अधिकारवाणीने बोलत नाही. काही प्रसंग झाल्यास ‘मी कुठे चुकलो ?’, याकडे लक्ष देतो.’’ त्यानंतर मनीषाताई मला म्हणाल्या, ‘‘मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि नेहमी स्वतःच्या साधनेकडे लक्ष देते.’’
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘वैवाहिक जीवनातही साधना करून आध्यात्मिक प्रगती साध्य करणे’ हा केंद्रबिंदू सांगितला असल्याने अनेक साधकांचे जीवन आनंदी होणे

वरील संभाषणानंतर माझ्या मनात विचार आले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे महत्त्व आणि त्यातील बारकावे शिकवले आहेत, तसेच ‘वैवाहिक जीवनातही साधना करून आध्यात्मिक प्रगती साध्य करणे’ हा केंद्रबिंदू सांगितला आहे. त्यामुळे अनेक साधकांचे जीवन आनंदी झाले आहे’, याबद्दल माझ्याकडून गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२५)