महाराष्ट्र : ५ वर्षांत २ सहस्र ७६४ बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई होऊनही घुसखोरी थांबेना !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याला बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई होत असली, तरी राज्यातील बांगलादेशींची घुसखोरी थांबण्याची चिन्हे नाहीत. जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्यात एकूण २ सहस्र ७६४ बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत. यांतील २ सहस्र २३७ बांगलादेशी अटकेत आहेत, तर ५२७ बांगलादेशी घुसखोरांना सीमापार धाडण्यात आले आहे. ५ मार्च या दिवशी विधान परिषदेमध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येविषयी विरोधी पक्षाच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील प्रकारे लेखी माहिती दिली.

यामधील कारवाईनुसार राज्याचे आतंकवादविरोधी पथक आणि स्थानिक पोलीस यांद्वारे प्रतिमासाला बांगलादेशी घुसखोरांना अटक केली जाते. काही बांगलादेशी नागरिकांना सीमापार धाडण्यात येते; मात्र तरीही महाराष्ट्रात बनावट ओळखपत्र असलेले नवनवे बांगलादेशी घुसखोर आढळत आहेत.

महाराष्ट्रात एवढे सापडले बांगलादेशी घुसखोर !

बनावट कागदपत्रांद्वारे भूमी खरेदी केल्या !

धक्कादायक प्रकार म्हणजे काही बांगलादेशी नागरिकांना केवळ त्यांच्या पॅनकार्डच्या आधारे बनावट ओळखपत्र देण्यात आली असल्याचे आढळले आहे. नावे पालटून बांगलादेशी घुसखोरांनी मुंबई आणि पुणे येथे भूमी खरेदी केल्याचे प्रकारही अन्वेषणात उघड झाले आहेत. हवेली (पुणे) येथे ओळखपत्रांची व्यवस्थित पडताळणी न करता बांगलादेशी घुसखोराला ओळखपत्र करून देणार्‍या शासकीय अधिकार्‍याला पोलिसांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली आहे. (अशा नोटिसा पाठवण्यापेक्षा त्यांना बडतर्फ करून आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा दिली गेली पाहिजे ! – संपादक)

२ महिन्यांत २५१ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

विशेषतः मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोर आढळले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ या २ महिन्यांमध्ये महाराष्ट्रात २५१ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत १७ बांगलादेशींना सीमापार धाडण्यात आले आहे. राज्यातील १८ पोलीस ठाण्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यांवरून राज्यात बांगलादेशी घुसखोरांची समस्या किती गंभीर झाली आहे, हे लक्षात येते.

संपादकीय भूमिका

देशभरात ५ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर असून एकूण आकडा पहाता ही आकडेवारी ०.००५ टक्के आहे. याने घुसखोरीला लगाम कसा लागू शकेल ? देशाची तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणारा भारत आणि त्याचा खङगहस्त असलेला महाराष्ट्र याची ही स्थिती अपेक्षित नाही, असेच म्हणावे लागेल.