
सातारा, २ मार्च (वार्ता.) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशी अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणारा आहे, तसेच त्यांची क्रयशक्ती वाढल्याने देशातील विकास झपाट्याने होण्यास हातभार लागणार आहे. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेण्याचे काम करतील. नागरिकांची बचत वाढून नागरिकच देश विकासाचे भागीदार बनण्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पात प्रावधान करण्यात आले आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले. सातारा येथील विश्रामगृहामध्ये नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
भंडारी पुढे म्हणाले की, शेतकरी, गरीब, महिला आणि युवा या विकसित भारताच्या ४ प्रमुख स्तंभांना सक्षम करण्याचे काम अर्थसंकल्पाने केले आहे. सामाजिक क्षेत्र, लहान मुले, युवा, शिक्षण, पोषण यांसह आरोग्यापासून ते स्टार्टअप्स आणि गुंतवणूक अशा प्रत्येक क्षेत्रातील प्रावधानांमध्ये लक्षणीय भर टाकण्यात आली आहे. देशाचा अर्थसंकल्प युवकांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे. कर, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय क्षेत्र, वीज आणि नियामक सुधारणा या ६ क्षेत्रांतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व सरकारी, माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, तसेच पुढच्या ५ वर्षांत सरकारी शाळांमध्ये ५० लाख अटल ‘टिंकरिंग लॅब्स्’ (एक प्रकारच्या प्रयोगशाळा) विकसित करण्यात येणार आहेत. या प्रावधानांमुळे जागतिक प्रतीचे शिक्षण मिळून देशातील युवा अधिक सक्षम होणार आहे.