शील आणि चारित्र्य संपन्नता हेच सर्वांत सुखदायक !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती

प्रश्न : किं स्वित् एकपदं सुखम् ?

अर्थ : अत्यंत सुखदायक गोष्ट कोणती ?

उत्तर : शीलम् ।

सुखदायक गोष्ट कोणती ?, याचे उत्तर आपण काय देऊ ? वातानुकूलित खोली, गुबगुबीत आसने, सर्व सोयींनी आणि विपुल साधनांनी सुसज्ज असे मोठे निवासस्थान, अनुकूल शब्दस्पर्शरसादी विषय पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळवून देणारी साधने, समाजामध्ये मानमान्यता, व्यापक सत्ता असलेले श्रेष्ठ पद, भोवती स्तुतीपाठकांचा गोतावळा आणि चांगली श्रीमंती इत्यादींना आपण सुखसाधने मानतो. ती प्राप्त करून घेण्यासाठी नाना प्रकारे आटापिटाही करत असतो. ‘सगळ्यात सुखदायक काय ?’, याचे उत्तर मात्र युधिष्ठिर ‘शील’ आणि ‘चारित्र्य संपन्नता’ असे देतो.

१. सध्याच्या काळात शील आणि चारित्र्य यांचा अभाव असणार्‍यांना आदर्श मानले जाणे

दुर्दैवाने ‘शील आणि चारित्र्य या गोष्टींचा ज्यांच्याकडे अभाव आहे’, असे पुढारी, खेळाडू आणि नट-नट्या हेच आज नव्या पिढीचे आदर्श झाले आहेत. सारी प्रतिष्ठा आणि लोकप्रियता त्यांनाच प्राप्त होते. उत्तान आणि अश्लील लिहिणारा साहित्यिक प्रसिद्धीस पावतो. त्यांच्या जीवनातील सारी लफडी-कुलंगडी वृत्तपत्रांच्या किंवा चरित्रग्रंथांच्या माध्यमातून लोकांच्या पुढे येतात, तरी त्याच्या पद-प्रतिष्ठेला कधी बाधा येत नाही. त्यामुळे नवयुवकांना या मंडळींचेच आकर्षण वाटते. ते त्यांनाच आदर्श मानतात.

२. लौकिक, मानसन्मान आणि प्रतिष्ठा

या गोष्टींची ओढ असणे, हे माणसाच्या ठिकाणी स्वाभाविक आहे. त्यामुळे चारित्र्यहीन व्यक्तींना मिळणारी प्रतिष्ठा समाजाच्या दृष्टीने फार घातक ठरते; कारण त्यामुळे व्यक्तीच्या पुढे नको ते आदर्श निर्माण होतात. तस्कर निवडून येऊन सत्ताधारी होतात. नटनट्या महाविद्यालयाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी मिरवतात. इंग्रजी साहित्यातील चोर्‍या करून आपले लेखन सजवणारे साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होतात. ‘अशा स्थितीत आपल्यालाही प्रतिष्ठा मिळावी’, असे वाटणारा तरुण त्यांच्याच मार्गाने जाऊ लागला, त्यांच्यासारखा वागू लागला, तर दोष कुणाचा ?

‘जे शीलवान आणि चारित्र्यसंपन्न आहेत, त्यांनाच मोठेपणा, मानसन्मान अन् प्रतिष्ठा इत्यादी लौकिक मिळाले पाहिजेत. शील आणि चारित्र्य यांचे महत्त्व मान्य होईल’, असे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले पाहिजे. जे चारित्र्यसंपन्न नाहीत, त्यांच्याविषयी समाजात अप्रियता असली पाहिजे. निदान त्यांची उपेक्षा झाली पाहिजे; पण असे होत नाही. सत्ता-संपत्ती, कला-कौशल्य, वक्तृत्व, विद्वत्ता आणि बुद्धीमत्ता यांना काही महत्त्व आहे. या गुणांची काही उपयुक्तताही आहे. याच्या जोडीने शील-चारित्र्याचा अभाव असेल, तर त्या गुणी व्यक्तीला प्रतिष्ठा मिळता कामा नये, अशी दक्षता समाजाने घेतली पाहिजे.

३. शील-चारित्र्याचा अभाव असणार्‍या व्यक्ती असतात विकारग्रस्त !

‘सत्ता-संपत्तीने युक्त असलेली ऐश्वर्यात लोळत आहेत’, असे दिसणारी माणसे खरोखरीच सुखी असतात का ? अत्यंत सुखावह आणि पूर्णपणे नैसर्गिक असलेली साधी गाढ झोपही या तथाकथित प्रतिष्ठितांना लाभत नाही. त्यांचे अंतरंग चिंता आणि अस्वास्थ्य यांनी पीडित असते. रक्तदाब आणि तशा प्रकारच्या विकारांनी ते त्रस्त झालेले असतात. ‘झोपेच्या गोळ्या घेणे’, हे त्यांचे नित्यकर्म होऊन बसते. म्हातारपणी असे काही होणे, हे स्वाभाविक आहे; पण तरुणपणी आणि मध्यम वयात असे विकार असणे भूषणावह नाही.

४. शीलसंपन्न माणूस हाच खरा सुखी !

शीलसंपन्न माणूस या दृष्टीने खरोखरीच सुखी असतो. मग त्याच्याजवळ ऐश्वर्य असो कि नसो. ‘बाहेरून दिसणारी धार्मिकता, म्हणजे शीलसंपन्नता नव्हे’, हे लक्षात घेतले पाहिजे. ज्यांचे धनसंपादनाचे मार्ग सरळ आणि प्रामाणिक आहेत, ज्यांची उपभोग घेण्याची वृत्ती नीतीला धरून आहे आणि जो अर्थतः शीलसंपन्न आहे, अशा व्यक्तीच्या सुखाला खरोखरीच पारावार असत नाही. आरोग्यशास्त्रदृष्ट्या आवश्यक असलेल्या अन्न-वस्त्र-निवार्‍याची सोय असली की, असा गृहस्थ कोणत्याही बाह्य परिस्थितीत शांत, समाधानी आणि प्रसन्न राहू शकतो. ‘सर्वदा शांत, समाधानी आणि प्रसन्न असणे’, हेच खरे सुख आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)