‘ज्या धार्मिक गोष्टी आजच्या काळात आचरणात आणण्यास अशक्य आणि जाचक भासतात, त्यात आपले तपःसामर्थ्य अन् सत्ता यांच्या बलावर धर्मतत्त्व न सुटता योग्य तो पालट करणे, हेही धर्मगुरु म्हणवणार्यांचे कर्तव्य होय. त्यांच्याकडून असे न होईल, तर आज आधीच स्वातंत्र्योन्मुख झालेला आणि म्हणूनच आचार्यांचीही पर्वा न ठेवण्यापर्यंत मनाची सिद्धता असलेला समाज वेळीच आटोक्यात आणला नाही, तर उधळलेल्या घोड्याप्रमाणे त्याची अन् त्यासमवेत धर्माचीही स्थिती होईल. ‘नाभूज्जारो न भर्ता च ।’ (पञ्चतन्त्र, तन्त्र ४, श्लोक ५९), म्हणजे ‘जार (व्यभिचारी पुरुष) नाही आणि पतीही नाही’, अशा विषम परिस्थितीमुळे धर्माला ग्लानी येत चालली आहे आणि राष्ट्राला भिन्न संस्कृतीची कीड लागल्याने हिंदु समाज भरडत आहे. तेव्हा अशा बिकट परिस्थितीचा विचार धर्मगुरूंनी न करणे, म्हणजे आद्यशंकराचार्यांचे आद्यपीठ आणि विद्यमान इतर धर्मपीठे अन् धर्मदंड यांस आतून पोट वाळवी लागल्याची मान्यता देण्यासारखे होणार आहे.’
– काकासाहेब (वासुदेव आत्माराम देशप्रभु)
(साभार : ‘आचार्यपीठांची अवनति !’, या ग्रंथातून)