वीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दिलासा नाही !

अधिवक्‍ता संग्राम कोल्‍हटकर यांची माहिती

पुणे – स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्‍या विरोधात पुणे सत्र न्‍यायालयात खटला चालू आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांनी अधिवक्‍त्‍यांच्‍या दाव्‍याच्‍या सुनावणीच्‍या वेळी न्‍यायालयात स्‍वतःहून उपस्‍थित रहाण्‍यापासून कायमस्‍वरूपी सवलत मिळावी, असा अर्ज न्‍यायालयात प्रविष्‍ट केला होता. यावर विशेष न्‍यायाधीश अमोल शिंदे यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी अटीशर्तींवर गांधी यांचा अर्ज संमत केला.

१. हा खटला स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्‍यकी सावरकर यांनी प्रविष्‍ट केला आहे. सात्‍यकी सावरकर यांच्‍या बाजूने अधिवक्‍ता संग्राम कोल्‍हटकर बाजू मांडत आहेत. याविषयी अधिवक्‍ता संग्राम कोल्‍हटकर म्‍हणाले, ‘‘या खटल्‍यात राहुल गांधी यांना मिळालेली सवलत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम २०५ अंतर्गत प्रत्‍येक आरोपीला मिळते. ते काँग्रेसचे नेते आहेत किंवा विरोधी पक्षनेते आहेत; म्‍हणून राहुल गांधींना कोणतीही विशेष सवलत मिळालेली नसून न्‍यायालय प्रत्‍येक आरोपीला अशा प्रकारे अधिवक्‍त्‍याच्‍या माध्‍यमातून मत मांडण्‍याची अनुमती देते. सामान्‍य सुनावण्‍यांसाठी राहुल गांधींना ही सवलत मिळाली असली, तरी जेव्‍हा खटल्‍याची आवश्‍यकता आहे, तेव्‍हा त्‍यांना पुणे येथे येऊन न्‍यायालयासमोर प्रत्‍यक्ष उपस्‍थित रहावेच लागेल.’’

२. न्‍यायालयाने त्‍यांना ही सवलत देतांना काही अटीही घातल्‍या आहेत. या अटींनुसार राहुल गांधी यांना कधीही ‘खटल्‍यातील अमुक एक कामकाज कधी झाले, तेव्‍हा मी उपस्‍थित नव्‍हतोच’, असा दावा करता येणार नाही. ‘आमच्‍या अधिवक्‍त्‍यांच्‍या अनुपस्‍थितीत या प्रकरणातील पुरावे नोंदवले गेले आहेत’, असा आक्षेप ते घेऊ शकणार नाहीत. राहुल गांधी यांच्‍या अधिवक्‍त्‍याला प्रत्‍येक सुनावणीला उपस्थित रहावेच लागेल, त्‍यात कोणतीही सवलत मिळणार नाही, अशा अटीशर्तींवर विशेष न्‍यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज संमत केला.