माझी आई श्रीमती अनुराधा मुळ्ये (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६४ वर्षे) यांच्याविषयी मला देवाने सुचवलेली कविता प.पू. गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी अर्पण करत आहे.

आई हे देवाचे रूप, आई हे पहिले गुरुरूप ।
लेकरांसाठी करते ती कष्ट खूप ॥ १ ॥
रात्रीचा दिवस करते आणि दिवसाची रात्र ।
दमली, थकली आहे, असे होत नाही मात्र ॥ २ ॥

उत्साही आणि सतत असते आनंदी ।
स्वभावदोष अन् अहंला घातली तिने बंदी ॥ ३ ॥
गर्व नाही कुठल्याही गोष्टीचा तिला ।
शिरसाष्टांग नमन त्या निरपेक्ष माऊलीला ॥ ४ ॥
लहानाचे मोठे केले, हात हाती घेतला ।
प्रत्येक हट्ट पुरवला, प्रत्येक शब्द झेलला ॥ ५ ॥
शिस्तीचे बाळकडू दिले, ‘शुभंकरोती’ने देवाच्या जवळ नेले ।
भक्तीचे खरे बीज आईनेच मनात पेरले ॥ ६ ॥
समवेत दिली अमूल्य संस्कारांची शिदोरी ।
तिच्यामुळेच प्रत्येक वेळी यश पडले पदरी ॥ ७ ॥
तिने घेतला अभ्यास, शाळेत खेळायला जायचे ।
ती सांगते आयुष्याच्या शाळेत सतत शिकायचे ॥ ८ ॥
कधी पडलो, धडपडलो ‘आई गं’ मुखातून शब्द आले ।
चढ-उतार येतातच, ती सांगते न डगमगता पुन्हा उभे रहायचे ॥ ९ ॥
नवीन शिकायचे अन् करून पहायचे ।
मनी देवाला स्मरत रहायचे ॥ १० ॥
तिच्या गोष्टी, तिच्या शिकवणी ।
न संपणार्या अमृततुल्य तिच्या आठवणी ॥ ११ ॥
कधी असते ती सरस्वती, तर कधी अन्नपूर्णा ।
अन्यायाविरुद्ध लढतांना कधी होते दुर्गा ॥ १२ ॥
देवीची रूपे, तत्त्वे अनेक ।
पण आई आहे मात्र एक ॥ १३ ॥
आईमुळे लेकीला मिळते माहेरपण ।
आई नसते तेव्हा घराला नसते घरपण ॥ १४ ॥
आईविषयी लिहिण्यासारखे आहे बरेच काही ।
पण लेकराची तेवढी पात्रताच नाही ॥ १५ ॥
आई मी ऋणी आहे तुझी अन् सदैव राहीन ।
कृतज्ञ होते, आहे अन् सदैव राहीन ॥ १६ ॥
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.