‘१९.२.२०२५ या दिवशी कै. राघवेंद्र माणगावकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांच्या मुलांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. कष्टमय जीवन : ‘बाबांच्या वडिलांचे बाबांच्या लहानपणीच निधन झाले. त्यामुळे बाबांवर घराचे दायित्व होते. बाबांची आई चार घरी जाऊन स्वयंपाकाची कामे करत असे. बाबा घरोघरी जाऊन वर्तमानपत्रे देत असत. त्यांनी उद्यानातील दिव्यांच्या खाली बसून अभ्यास केला.
२. बाबा मितभाषी होते.
३. त्यांना लहानपणापासून कष्टाची सवय होती. ते प्रत्येक गोष्ट काटकसरीने आणि आवश्यक तेवढीच वापरत असत.
४. लहानपणापासून देवाची सेवा करणे : ते प्रत्येक शनिवारी बेळगाव येथील शनिमंदिरात जात असत आणि तेथे येणार्या भाविकांना तीर्थ देण्याची सेवा करत असत. त्यांना लहानपणापासूनच देवाविषयी ओढ होती.

५. प्रामाणिकपणे नोकरी करणे
५ अ. प्रलोभनाला बळी न पडणे : धरण बनवतांना तेथील जागा मोकळी करण्यासाठी आणि डोंगर फोडण्यासाठी स्फोटके वापरतात. बाबा नोकरी करत असतांना त्यांच्याकडे त्याविषयी दायित्व होते. एकदा एका व्यक्तीने बाबांना सांगितले, ‘‘आम्ही तुम्हाला पुष्कळ पैसे देऊ. आम्हाला त्यातील काही स्फोटके द्या.’’ तेव्हा बाबांनी प्रलोभनाला बळी न पडता त्या व्यक्तीला कोणतीही वस्तू दिली नाही आणि त्या व्यक्तीला ‘त्वरित निघून जा’, असे सांगितले.
५ आ. ‘प्रामाणिक व्यक्तीमत्त्व’ असा पुरस्कार मिळणे : बाबांची नोकरी शासकीय आणि दायित्वाची असल्यामुळे त्यांना शासनाकडून एक चारचाकी गाडी अन् चालक उपलब्ध होता, तरीही बाबांनी कार्यालयात जातांना कधीही चारचाकी गाडीचा वापर केला नाही. ते कार्यालयात नेहमी चालत जात असत. त्यांनी वैयक्तिक कामासाठीही कधी कार्यालयीन चारचाकी गाडीचा वापर केला नाही. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर त्यांना ‘प्रामाणिक व्यक्तीमत्त्व’ असा पुरस्कार दिला गेला.
६. सनातन संस्थेशी संपर्क : एकदा चिपळूण येथील स्वामी समर्थ मंदिरात भंडार्याचे आयोजन केले होते. तेथे सनातन संस्थेचे साधक आले होते. त्यांनी बाबांना ‘तुम्ही रहात असलेल्या संकुलात एक सत्संग चालू करू शकतो का ?’, असे विचारले. तेव्हापासून बाबा सनातन संस्थेच्या संपर्कात आले. बाबांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांनाही संस्थेशी जोडून घेतले. आम्ही रहात असलेल्या संकुलात संस्थेचे कार्य दिवसागणिक वाढत होते.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभलेला सत्संग
७ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले घरी येणे आणि त्यांची पाद्यपूजा करण्याची संधी मिळणे : २५.२.१९९६ या दिवशी अलोरे (चिपळूण, रत्नागिरी) येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पहिली जाहीर सभा होती. तेव्हा आम्हाला ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) कार्यक्रमस्थळी येतील आणि तेथूनच परत जातील’, असा निरोप मिळाला होता. नंतर काही वेळानंतर आम्हाला ‘गुरुदेव आमच्या घरी येणार आहेत’, असे समजले. ‘गुरुदेव घरी येणार आहेत’, हे समजताच बाबांचा कंठ दाटून आला. ‘गुरुदेव घरी आल्यावर त्यांची पाद़्यपूजा करूया’, असे आम्ही ठरवले; पण ‘गुरुदेव पाद्यपूजा करून घेत नाहीत’, असे आम्हाला समजले, तरीही आम्ही पाद्यपूजेची सर्व सिद्धता करून ठेवली. गुरुदेव घरी आल्यावर आई-बाबांनी त्यांना पाद्यपूजा करण्याविषयी विचारले. तेव्हा गुरुदेवांनी होकार दिला. नंतर आई-बाबांनी गुरुदेवांची पाद्यपूजा केली.

७ आ. जाहीर सभेच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या वडिलांना त्यांच्या शेजारी बसायला सांगणे : आलोरे येथील जाहीर सभेत प.पू. गुरुदेवांनी प्रवचन चालू करण्यापूर्वी एक आसंदी मागवली आणि बाबांना त्यांच्या बाजूला बसायला सांगितले. नंतर प.पू. गुरुदेवांनी प्रवचन चालू केले. त्या वेळी बाबांचा कंठ दाटून आला. त्यांनी सभा संपेपर्यंत जराही वर पाहिलेे नाही. त्यांची पुष्कळ भावजागृती झाली.
८. सेवा परिपूर्ण करणे : बाबा प्रत्येक सेवा नीटनेटकेपणाने करत असत. साधक बाबांचा पुष्कळ आदर करत असत. बाबांचा सेवा परिपूर्ण करण्याकडे कल होता.
९. गुरुदेवांप्रती भाव
९ अ. गुरुदेवांना अपेक्षित अशी कृती करणे : एकदा प.पू. गुरुदेवांनी बाबांना त्यांच्या समवेत दौर्यावर येण्याविषयी विचारले. तेव्हा कसलाही विचार न करता बाबा गुरुदेवांच्या समवेत गेले. त्यांची ही कृती गुरुदेवांना पुष्कळ आवडली.
९ आ. गुरुदेवांना मनातील विचार कळल्यामुळे भावजागृती होणे : एकदा एके ठिकाणी सभास्थळी पुष्कळ उकाडा होत होता. त्या वेळी बाबांच्या मनात ‘थोडा पाऊस आला असता, तर वातावरण थंड झाले असते’, असा विचार आला. तेव्हा सभा झाल्यावर त्या ठिकाणी पाऊस आला. त्या वेळी ‘गुरुदेवांना आपल्या मनातील कळते’, असे वाटून बाबांची पुष्कळ भावजागृती झाली.
९ इ. पूर्णवेळ साधनेला प्रारंभ करणे : वर्ष २००१ मध्ये बाबांनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. (तेव्हा त्यांची नोकरी १५ वर्षे शेष होती.) कार्यालयातील लोकांनी त्यांना ‘एवढ्या लवकर निवृत्ती घेऊ नका’, असे सांगितलेे; पण केवळ गुरुंवरील श्रद्धेमुळे बाबांनी अन्य कसलाही विचार न करता स्वेच्छानिवृत्ती घेतली. बाबा पूर्णवेळ साधना करू लागल्यावर नातेवाइकांनी त्यांना पुष्कळ विरोध केला. अजूनही नातेवाईक आम्हाला पुष्कळ विरोध करतात. बाबा आम्हाला नेहमी सांगायचे, ‘‘आपण गुरुसेवा करत आहोत, तर गुरु आपली काळजी घेणारच आहेत.’’
१०. गुरुदेवांच्या कृपेमुळे अपघातातून वाचणे : वर्ष २०१८ मध्ये बाबा दुचाकीवरून जात असतांना एक कुत्रा आडवा आला आणि ते गाडीवरून पडले. त्या वेळी त्यांच्या बोटांना थोडे ‘फ्रॅक्चर’ झाले. या व्यतिरिक्त त्यांना अधिक काही झाले नाही. त्यानंतर त्यांना ‘अपघात कसा झाला ?’, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘काय झाले ते कळले नाही; पण गुरुदेवांनी मला अलगद बाजूला आणून ठेवलेे; म्हणून मी वाचलो.’’
११. कर्करोग झाल्याचे निदान होणे
११ अ. चिकाटीने नामजपादी उपाय करणे : वर्ष २०२१ मध्ये बाबांना कर्करोग असल्याचे निदान झाले. त्या वेळी त्यांना रुग्णालयात भरती केले होते. ते अखंड नामजप करत असत. तेव्हा सद़्गुुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी बाबांना प्रतिदिन ८ घंटे नामजप करायला सांगितला होता. बाबा प्रतिदिन ८ घंटे नामजप करत असत. बाबांना मधून मधून रुग्णालयात जावे लागत असे. त्या वेळीही ते नामजप पूर्ण करून जायचे. त्यांचा गाडीमधून येता-जातांना, तसेच रुग्णालयात असतांना आणि घरी आल्यावरही नामजप चालू असायचा.
११ आ. रुग्णालयात असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भ्रमणभाषवरून नामजपादी उपाय सांगणे : बाबांच्या निधनाच्या आदल्या दिवशी ते आश्रमात आले असतांना त्यांच्याशी श्री. राम होनप, तसेच अन्य काही साधक बोलत होते. त्या वेळी श्री. राम होनपदादांनी बाबांना प.पू. गुरुदेवांविषयी विचारले असता बाबांनी त्यांची अनुभूतीही सांगितली. तेव्हा बाबांची पुष्कळ भावजागृती होत होती. त्याच रात्री १२ वाजता अकस्मात् बाबांच्या छातीत दुखायला लागले. ‘त्यांना पित्त झाले असेल’, असे वाटून आम्ही त्यांना पित्तासाठीची औषधे दिली; पण त्यांना गुण आला नाही; म्हणून आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो.
रुग्णालयात बाबांना ‘व्हेंटिलेटर’ (रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छवास करण्यास साहाय्य करणारे साधन) लावले होते. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भ्रमणभाषवरून बाबांसाठी नामजपादी उपाय सांगत होत्या. त्याही स्थितीत बाबा मान हलवून होकार देत होते. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीमुळे बाबांना सद़्गती मिळाली’, असे आम्हाला वाटले. त्याबद्दल आम्ही प.पू. गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
‘बाबांमुळे आज आम्ही साधना करू शकत आहोत’, त्याबद्दल आम्ही त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे. ‘गुरुदेव, तुमच्या कृपेमुळे आम्हाला साधक पिता लाभले’, याबद्दल आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. वैभव माणगावकर (कै. राघवेंद्र माणगावकर यांचा मुलगा) आणि सौ. श्रेया गावकर (कै. राघवेंद्र माणगावकर यांची मुलगी), फोंडा, गोवा. (६.२.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |