महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने आयोजित राहुल सोलापूरकर यांचे व्‍याख्‍यान रहित !

‘माधवराव गाडगीळ मित्रपरिवारा’कडून वक्‍तव्‍याचा जाहीर निषेध

अभिनेते श्री. राहुल सोलापूरकर

मिरज, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील श्रीकाशीविश्‍वेश्‍वर मंदिरात ‘महाशिवरात्र कीर्तन महोत्‍सवानिमित्त’ आयोजित करण्‍यात आला आहे. त्यात पूर्वीच्या नियोजनानुसार अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वाद़ग्रस्त विधानांमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ‘माधवराव गाडगीळ मित्रपरिवारा’कडून वक्तव्याचा जाहीर निषेध करत असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान रहित करत आहोत, अशी माहिती श्री. माधवराव गाडगीळ यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांना दिली.

श्री. माधवराव गाडगीळ पुढे म्‍हणाले, ‘‘या महोत्‍सवात शिवलीलामृत पारायण, ‘झी वाहिनी’चे श्री. मंगेश बोरगावकर यांचे गायन, ह.भ.प. (सौ.) सुखदा मुळे यांचे सुश्राव्‍य कीर्तन, भजन, तसेच विविध वैद्यकीय चाचण्‍यांसह विनामूल्‍य आरोग्‍य पडताळणी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘श्री काशी विश्‍वेश्‍वर देवस्‍थाना’च्‍या पटांगणात हा महोत्‍सव आयोजित केला जाणार आहे. भक्‍तांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित राहून या धार्मिक आणि सांस्‍कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्‍यावा.’’