प्रयागराज येथे अधिक शुल्काने वस्तू आणि खाद्य पदार्थांची विक्री करून भाविकांची लूट !

प्रशासनाचा कानाडोळा !

श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज

प्रयागराज – महाकुंभक्षेत्री भाविकांना जीवनावश्यक विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ यांची विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुकाने लागली आहेत. तथापी या दुकानातूंन भाविकांना वस्तू आणि खाद्यपदार्थांची अधिक शुल्काने विक्री करण्यात येत आहे. कुंभक्षेत्री प्रारंभी १० रुपयाला कुल्हडमधून मिळणारा चहा १५ रुपयाला विकला जात आहे. याचसमवेत १ समोसा १० रुपयाला मिळत होता. मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी या दिवशी भाविकांची गर्दी वाढल्यावर हाच समोसा २० रुपये किमतीला विकला गेला. अशा पद्धतीने भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांसमोर ही लूट चालू असतांना त्यांनी याकडे कानाडोळा केला आहे.

१. याविषयी चहावाल्याकडे विचारणा केली असता तो म्हणाला की, दूध आणि कुल्हड यांचे शुल्क वाढल्याने आम्हाला अधिक शुल्काने चहाची विक्री करावी लागत आहे, तसेच प्रयागराज येथे अधिकतर अमूल आस्थापनाच्या दुधाची विक्री होते; मात्र हे दूध वापरून चहा केल्यानंतर काळ्या रंगाचा चहा होत आहे.

२. त्यामुळे या दुधात अधिक प्रमाणात पाणी मिसळल्याची शंका आहे. याचसमवेत झुँसी येथील बिकानेर बेकरीतून मौनी अमावस्येच्या दिवशी चक्क २५ रुपयाला पाण्याची बाटलीची विक्री केली गेली. तेथे १५ रुपयाला मिळणारी कचोरी २५ रुपयांला विकण्यात आली.

३. प्रयागराज येथे फळांचे शुल्क वाढवून त्याची विक्री करण्यात येत आहे, तसेच कुंभक्षेत्री ३ आणि ४ चाकी वाहनांतून भाविकांना ने-आण करणार्‍या वाहनधारकांकडून ४ पटीने पैसे आकारून भाविकांची लूट चालूच आहे.

४. भाविकांना आपल्या गावी लगेच जायाचे असल्याने याविषयी तक्रार देण्यास भाविक टाळत आहेत. कुंभक्षेत्री अशा सर्व गोेष्टी होत असतांना प्रशासकीय स्तरावर मात्र संबंधितांवर कारवाई करण्यात कचुराई केली जात आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दोषी वाहनधारक, दुकानदार यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांतून होत आाहे.