महाकुंभामध्ये ‘साहू सेवा दला’कडून भाविकांसाठी नि:शुल्क सेवा !

प्रयागराज – ‘नर सेवा हीच नारायण सेवा’ या भावाने सेवारत असलेले ‘अखिल भारतीय साहू सेवा दला’चे श्री चंद्रिका प्रसाद साहू हे गेल्या १८ वर्षांपासून अविरतपणे भाविकांना नि:शुल्क निवास आणि भोजन सेवा देत आहेत.

यंदाच्या महाकुंभमेळ्यात मुक्ती मार्ग येथे ‘साहू सेवा दला’कडून कुंभमेळ्याला येणार्‍या भाविकांसाठी एकाच वेळी ३०० भाविक राहू शकतील अशी नि:शुल्क निवास आणि भोजनव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी भाविकांना चहा, न्याहरी, गरम पाणी, अद्यावत स्नानगृह, प्रसादान गृह अशा सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. येथील प्रत्येक व्यवस्था स्वतः चंद्रिका प्रसाद आणि त्यांचे कार्यकर्ते स्वतः पहात असतात. देशभरातून तसेच विदेशांतूनही काही भाविक इथे येऊन या सुविधांचा लाभ घेतात. यावर्षी २९ डिसेंबर पासून प्रयागराज महाकुंभ मेळ्यात ही सेवा त्यांनी चालू केली आहे, आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक भाविकांनी याचा लाभ घेतला आहे. ही सेवा महाशिवरात्रीपर्यंत चालू ठेवणार असल्याचे चंद्रिका प्रसाद यांनी सांगितले.

सामूहिक विवाह सोहळा

‘साहू सेवा दला’कडून दरवर्षी प्रयागराज येथे सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ५१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. आतापर्यंत १ सहस्रपेक्षा अधिक जोडप्यांचे विवाह साहू सेवा दलाने लावून दिले आहेत.