कुंभक्षेत्रात गर्दी आणि वाहने नियंत्रित करण्यास पोलीस ठरत आहेत अपयशी !

प्रयागराज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यात ३ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या अमृतस्नानासाठी कुंभक्षेत्रात गर्दी वाढत आहे, तर दुसरीकडे ही वाढती गर्दी आणि वाहतूक व्यवस्था यांवर नियंत्रण राखवण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे. २ फेब्रुवारी या दिवशी वाहतूक व्यवस्थेचा बोजबारा उडतांना दिसून आला. रस्त्यावर असलेले पोलीस भाविक आणि भाविकांची गर्दी यांना नियंत्रित न करता केवळ बॅरिकेड्स (अडथळे) लावून उभे रहात आहेत. पोलीस वाहतूक नियंत्रित करण्याविषयी प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे ३ फेब्रुवारी या दिवशी पोलीस वाहतूक आणि भाविकांची गर्दी यांचे नियंत्रण कसे करणार ? याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

मौनी अमावास्येच्या अमृतस्नानाच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेला भाविकांची गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जाणे हे सर्वांत मोठे कारण ठरले होते. त्यामुळे ३ फेब्रुवारीच्या अमृतस्नानाच्या दृष्टीने भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण राखण्यासाठी पोलिसांनी ध्वनीवर्धकावरून सूचना देण्यास प्रारंभ केला आहे; मात्र केवळ पाण्टून पूल बंद करण्यात आले आहेत आणि भाविकांनी घाटांवर गर्दी करू नये, याविषयीची सूचना देण्यात येत आहेत. प्रत्यक्षात रस्त्यावर असलेल्या भाविकांच्या नियंत्रणासाठी अद्यापही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलट कुंभक्षेत्रातील सर्व मार्गावर चौकाचौकात ‘बॅरिकेट्स’ लावण्यात आले आहेत. सर्व मार्गावर जाण्यासाठी थोडीच जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चौकाचौकांमध्ये गर्दी होत आहे. बॅरिकेट्सद्वारे रस्ते बंद करण्यात आल्यामुळे गर्दी वाढली आहे. २ फेब्रुवारीचे हे चित्र पहाता ३ फेब्रुवारी या दिवशी अमृतस्नानाच्या वेळी पोलीस भाविकांचे नियंत्रण कसे करणार ? हा प्रश्‍नच आहे.