Prayagraj Kumbh Parva 2025 : अध्यात्मातील अनुभूती घेण्यासाठी मी महाकुंभक्षेत्री आलो आहे ! – श्रीकृष्णाची भूमिका केलेले अभिनेते सौरभ राज जैन

प्रयागराज कुंभपर्व २०२५

श्री. सौरभ राज जैन

प्रयागराज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – १४४ वर्षांनंतर हा विशेष महाकुंभ होत आहे. देशातीलच नव्हे, तर परदेशातूनही भाविक इकडे येत आहेत. मीसुद्धा त्यांतील एक छोटासा भाग आहे. अध्यात्माविषयी जे चिंतन-मनन आपण करत असतो, त्याची अंशात्मक अनुभूती घेण्यासाठी मी येथे आलो आहे.

गीतेतील अनेक गोष्टी आहेत, ज्या काळानुरूप आज आवश्यक आहेत. त्यातून घेण्यासारखे पुष्कळ आहे, असे मत वर्ष २०१४ मध्ये प्रसारित झालेल्या ‘महाभारत’ मालिकेच्या माध्यमातून श्रीकृष्णाची भूमिका केल्यामुळे घराघरांत पोचलेले अभिनेते श्री. सौरभ राज जैन यांनी केले. ‘दिव्य ज्योती जाग्रति संस्थान’च्या वतीने ३१ जानेवारीला ‘गीता-ओ-लॉजी’ नावाचा गीतेतील तत्त्वज्ञान विविध प्रयोगांद्वारे समजावून सांगण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. सौरभ राज जैन उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला.


श्रीकृष्ण भूमिका करवून घेत असल्याची अनुभूती घेतली ! – जैन

वर्ष २०१४ मधील ‘महाभारत’ मालिकेतील गाजलेले श्रीकृष्णाचे पात्र करण्याविषयी श्री. सौरभ राज जैन यांनी सांगितले की, तेव्हा मला श्रीकृष्ण माझ्या समवेत आहे, अशी सारखी अनुभूती यायची. ‘मी भूमिका करतांना केवळ निमित्त आहे, श्रीकृष्ण करवून घेत आहे’, असे अनुभवत होतो. जी व्यक्ती जाणते की, मी काही करत नाही, त्याच्याकडून कार्य होते.