हरमल येथे शॅकच्या परप्रांतीय कामगारांकडून स्थानिक युवकाची हत्या

(‘शॅक’ म्हणजे समुद्रकिनार्‍यावरील खाद्यपदार्थ आणि मद्यपुरवठा करणारे केंद्र)

पेडणे, २७ जानेवारी (वार्ता.) – हरमल येथे किरकोळ कारणावरून शॅकच्या कामगारांनी समुद्रावर फिरण्यास गेलेले स्थानिक अमर दत्ताराम बांदेकर (वय ३७ वर्षे) यांची हत्या केली. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी शॅकवरील कामगार तथा संशयित सुरेंद्र कुमार (मूळचा हिमाचल प्रदेश, वय ३९ वर्षे) याच्यासह एकूण १५ जणांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सुरेंद्र कुमार याने अमर दत्ताराम बांदेकर यांना लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण करून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने आक्रमण केले. यामुळे अमर बांदेकर समुद्रकिनार्‍यावर बेशुद्धास्थेत पडले. स्थानिकांनी त्यांना उपचारार्थ तुये येथील रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

अमर बांदेकर हे २६ जानेवारी या दिवशी सायंकाळी नेहमीप्रमाणे चालण्याच्या व्यायामासाठी समुद्रकिनार्‍यावर गेले होते. या वेळी किनार्‍यावरील पाण्यानजीक असलेले पटल आणि खुर्ची हालवल्याने तेथील शॅकच्या एका कामगाराने अमर बांदेकर यांना मारहाण केली. या वेळी दोघांमध्ये झटापट झाली. या वेळी अन्य २-३ शॅक्सवरील कामगार धावत आले आणि त्यांनी अमर बांदेकर यांना अमानुष मारहाण केली.

समुद्राच्या पाण्याजवळ पटल आणि खाटा लावणार्‍या शॅक्सची अनुज्ञप्ती रहित करा !

समुद्राच्या लाटांना टेकून पटल, खाटा लावणार्‍या शॅक्स व्यावसायिकांची अनुज्ञप्ती रहित करावी, अशी मागणी संतप्त जमावाने केली आहे. या भागात बहुतांश शॅक्स हे परप्रांतीय चालवत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी दहशत निर्माण केली आहे. पोलिसांनी मारहाणीच्या घटनेचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाने त्वरित कारवाई करून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी ! – आमदार जीत आरोलकर

पोलीस आणि पर्यटन खाते यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी हरमल येथील घटनेनंतर स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी केली आहे.