गोवंश तस्करी प्रकरणातील आरोपींना कारागृहात डांबा ! – शिवसेनेचे आमदार नीलेश राणे

गोवंश तस्करी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील गर्जना सभा !

शिवसेनेचे आमदार नीलेश राणे

चिपळूण, २५ जानेवारी (वार्ता.) – येथील गोवंश तस्करी प्रकरणातील आरोपी असणारे इक्बाल खेरटकर, मुराद खेरटकर, शमशुद्धीन खेरटकर (सर्व रहाणार खेर्डी मोहल्ला) आणि जुनेद बागवान (कराड) हे असा गुन्हा वारंवार करत असून यांना एम्.पी.डी.ए. कायद्याच्या अंतर्गत वर्षासाठी तात्काळ स्थानबद्ध (तुरुंगवास) करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी येथील गर्जना सभेत केली.

जिल्ह्यात गोवंश तस्करी, तसेच गोहत्येची प्रकरणे वारंवार घडत असल्याने हिंदु जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. येथील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने २२ गोवंशियांची तस्करी करणारा ‘ट्रक’ पकडला होता. या घटनेची नोंद घेऊन आमदार नीलेश राणे यांनी २५ जानेवारी या दिवशी चिपळूण येथे गोमातेच्या रक्षणार्थ गर्जना सभा घेतली. या सभेत ते बोलत होते. या सभेला सर्वपक्षीय आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार नीलेश राणे पुढे म्हणाले की,

१. पोलिसांनी आमच्या सूचनेला प्रतिसाद देत आरोपींवर एम्.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.

२. हिंदु समाज सहिष्णु असल्याने ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदूंच्या मुलींना फसवले जात आहे, वक्फ कायद्याद्वारे हिंदूंची भूमी बळकावली जात आहे; मात्र हिंदू हे सर्व निमूटपणे सहन करत आहेत. यापुढे हे चालणार नाही.

३. विशिष्ट समाज हिंदूंच्या धार्मिक भावना समजून घेत नसल्याने यापुढे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.

४. गोवंश तस्करी आणि गोहत्या यांविषयी गुन्हेगार असणार्‍या आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत.

या वेळी शिवसेनेचे शशिकांत चव्हाण, भाजपचे माजी आमदार विनय नातू, विश्व हिंदु परिषदेचे अनिरुद्ध भावे आणि ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. या प्रसंगी २२ गोवंशियांची तस्करी करणारा ‘ट्रक’ पकडून देणारे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सर्वश्री विनोद भुरण, निहार कोवळे, विक्रम जोशी आणि श्रीधर भुरण यांचा सत्कार करण्यात आला.

धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी (एम्.पी.डी.ए.) कायदा करण्यात आला. यात आरोपीला एका वर्षासाठी तात्काळ स्थानबद्ध (तुरुंगवास) करण्यात येते. या विरोधात केवळ उच्च न्यायालय आणि मंत्रालयात दाद मागता येते.