
हिंदूंची लाखो वर्षांची परंपरा अखंडित तेवत ठेवणारा कुंभमेळा ! सध्या प्रयागराज येथे चालू असलेला मेळा १४४ वर्षांनी आल्याने तो ‘महाकुंभमेळा’ आहे. सूर्य आणि गुरु ग्रह यांच्या १४४ वर्षांमधून एकदा येत असलेल्या विशिष्ट राशींमधील संबंधांमुळे हा योग येत असतो. याआधी वर्ष १८८१ आणि पुढील महाकुंभ वर्ष २१६९ मध्ये होणार असल्याने दोन महाकुंभ पहाण्याचे महद्भाग्य सर्वसाधारण मानवांचे नाही. असे असले, तरी असे काही योगी महापुरुष आहेत, जे दिव्य भारतभूमीतील हिमालय अथवा इतरत्र जंगलांत राहून गेली शेकडो वर्षे साधनारत आहेत. त्यांच्यापैकी काही जण अशा मेळ्यांना येत असतात, असे सांगितले जाते. थोडक्यात त्यांच्या येण्याने कुंभमेळ्याच्या चैतन्यात अनेक पटींनी वाढ होत असते, तर अशांचा सत्संग अजाणतेपणे का होईना, सर्वसाधारण हिंदु समाजाला मिळणे हे हिंदूंचे महद्भाग्य आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. अध्यात्म, तपश्चर्या, अनासक्ती, शुद्ध भाव, भगवत्प्राप्ती, पुण्यसंचय आदींचा समुच्चय यांचे अलौकिक दर्शन घेण्याचे पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट, किंबहुना एकमेव ठिकाण म्हणजे हा महाकुंभमेळा ! महाकुंभमेळ्याची अद्वितीयता शब्दांत व्यक्त करणे कदापि अशक्य ! तीर्थक्षेत्रांचा राजा असलेल्या प्रयागराजमध्ये संगम तटावर या काळात केले जाणारे ‘कल्पवास’ नावाचे व्रताचरण ‘मनुष्याला एका कल्पासमान म्हणजे ४३२ कोटी वर्षांसमान फळ देते’, असे आपल्या धर्मग्रंथांत वर्णिले आहे. हे अत्यंत कठीण व्रत १५ लाख लोक संगमतटी राहून करत आहेत. कुंभमेळ्यात सहभागी होऊन अंशत: तरी त्याची अद्वितीयता अनुभव करता येऊ शकते. त्यामुळे भारतातीलच नव्हे, तर जगभरातील जिज्ञासू, भक्त, साधक या आध्यात्मिक सत्संगाचा लाभ घेण्यासाठी येथे आले आहेत.
हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीवर चिखलफेक करणारे आजच्या काळातील महाभाग, म्हणजेच ‘बीबीसी’, ‘वापो’, ‘एन्.वाय.टी.’ ही विदेशी प्रसारमाध्यमे ! नागा साधूंवर टीका करणे, हा त्यांचा नेहमीचा छंद ! हिंदूंच्या कुंभमेळ्याचे नकारात्मक चित्रण करण्याचा हा कुटील डाव आहे, हे जगजाहीर आहेच. धर्मशिक्षणाच्या अभावी आजची तरुण पिढी त्याला फसत आहे, हे आपणासारख्या सश्रद्ध हिंदूंसाठी मात्र चिंतेचे होय. कुंभमेळ्यातील चैतन्यामुळे आणि विदेशी भाविकांच्या भारत अन् हिंदु धर्म यांप्रती असलेल्या उत्कट भावामुळे खरे तर धर्माचे माहात्म्य उमजण्यासाठी तरुणांमध्ये जिज्ञासेची ठिणगी पडली पाहिजे. धर्म जगण्यासाठी ती प्रेरित झाली पाहिजे; परंतु असे होत आहे कि नाही, हा प्रश्न आहे. आज ज्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे तरुण पिढी दिशाहीन झाली आहे, तीच गत भारतीय प्रसारमाध्यमांचीही ! महाकुंभमेळ्याची डोळे दीपवणारी आध्यात्मिक समृद्धी, पर्यायाने भारताचे सांस्कृतिक आणि दैवी माहात्म्य जगाला सांगून भारताची पत उजळून काढण्याची ही सुवर्णसंधी आहे. ती सोडून उथळ विचारांनी प्रेरित अनेक प्रसारमाध्यमे कुंभमेळ्याला गालबोट लावण्यासाठी स्पर्धा करत आहेत.

पीत पत्रकारिता !

मोनालिसा भोसले नावाच्या एका जपमाळ विकणार्या मध्यप्रदेशातील इंदूरच्या मुलीचे उदाहरण घ्या ! ती महाकुंभमेळ्यात जपमाळा विकत असतांना तिच्या सौंदर्यामुळे प्रसारमाध्यमे हात धुवून तिच्या मागे लागली. यात गल्लीबोळात झालेले यू ट्यूब चॅनल्सच नाहीत, तर प्रथितयश ‘सो कॉल्ड मेनस्ट्रीम’ (कथित मुख्य प्रवाहातील) प्रसारमाध्यमांचाही सहभाग आहे. बिहारचे ‘भोजपुरिया जवान ४५’ नावाच्या यू ट्यूब चॅनलने तर कहरच केला. त्याने ‘नागा साधू आणि अघोरी बाबा यांना सोडून भक्त मोनालिसाच्याच मागे लागले’, अशा प्रकारे अत्यंत लज्जास्पद वार्तांकन केले. तो व्हिडिओ केवळ ४ दिवसांत अडीच लाख लोकांनी पाहिला. अशा वार्तांकनात धर्म, अध्यात्म यांचा लवलेश तर नाहीच; पण ते समाजाला अश्लीलतेकडे नेत आहे. एवढे की, या मोनालिसाला रातोरात मिळालेल्या अभूतपूर्व प्रसिद्धीमुळे तिला तिचा व्यवसाय गुंडाळून गावी परतावे लागले आहे. धर्मावर लांच्छन लावण्याचे पाप करणार्या या प्रसारमाध्यमांनी या मुलीच्या पोटावरही पाय ठेवला आहे. अशी पीत पत्रकारिता करणार्यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कायदा होऊ नये ?
दुसरे उदाहरण ‘आयआयटी बाबा’ यांचे ! अभय सिंह नावाचा हा मध्यमवयीन तरुण मूळचा ‘आयआयटी पवई’तून शिक्षण घेतलेला अभियंता. त्याचा विषय आरंभी जेव्हा जगासमोर आला, तेव्हा कॅनडातील ३६ लाख वार्षिक वेतन असलेला एक यशस्वी अभियंता सर्वकाही सोडून त्याने अध्यात्ममार्गाला वाहून घेतल्यामुळे अनेक धर्मप्रेमी हिंदूंना त्याचा सार्थ अभिमान वाटण्यासारखे होते; परंतु पुढे थिल्लर पत्रकारिता करणार्या काही पत्रकारांनी ‘अभय सिंह याने हा मार्ग कसा अनुसरला ?’, ‘त्याला गर्लफ्रेंड होती का ?’, असे अत्यंत खालच्या थराला जाऊन वैयक्तिक प्रश्न विचारले. आपल्याकडे नको तिथे ‘शितावरून भाताची परीक्षा’ करण्याची परंपरा आहेच. आता अभय सिंह यांच्या या उदाहरणातून सर्वच साधू असे असतात, हे सांगायला आमची पुरोगामी जमात मोकळी ! यातून हिंदु पुनरुत्थान साध्य होईल कि हिंदु धर्माची निंदानालस्ती होईल ?
हे लांच्छनास्पद !
सर्वस्वाचा त्याग करून संन्यास घेण्याला भारतामध्ये उच्चतम स्थान आहे. अनेक आध्यात्मिक लोक नागा साधू, साध्वी बनून अनासक्तपणे जीवन व्यतित करतात. स्वार्थ, पैसा, पद, सामाजिक प्रतिष्ठा या जगरहाटीपासून दूर जाऊन भगवत्प्राप्तीचा मार्ग अधिक सुकर व्हावा, यासाठी अनेकांनी असा मार्ग अनुसरणे, हे प्रवाहाच्याच विरुद्ध पोहणे आहे. असे असतांना कोण हर्षा रिछारिया नावाची ‘मॉडेल’ एका आखाड्याद्वारे साधना करत आहे, तर आपली लाजिरवाणी प्रसारमाध्यमे त्यांना ‘सर्वांत सुंदर साध्वी’ म्हणत फिरत आहेत. त्यात आता नव्वदच्या दशकातील चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णी यांचे नाव जोडले गेले आहे. कुलकर्णी या गेली २५ वर्षे अमेरिकेत होत्या. अमली पदार्थांच्या आहारी जाऊन त्याचीच तस्करी करणार्या विकी गोस्वामी याच्यासह त्या इतकी वर्षे राहिल्या. नुकतेच भारतात परतल्यावर त्यांनी आता किन्नर आखाड्याची दीक्षा घेतली आहे आणि ‘महामंडलेश्वर माई ममतानंद गिरी’ झाल्या आहेत. त्यांची ही वाटचाल संशोधन आणि कुतुहूलाचा विषय असू शकेल; पण आता सर्व प्रसारमाध्यमे सर्वकाही सोडून त्यांचीच प्रसिद्धी करत आहेत. येथे ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; परंतु काळ सोकावतो’, या म्हणीनुसार काळ सातत्याने सोकावत आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! कुंभमेळ्यातून ‘अर्थ’ आणि ‘काम’ यांचे ‘ग्लॅमर’ नव्हे, तर ‘धर्म’ आणि ‘मोक्ष’ यांची अपरिहार्यता अधोरेखित झाली पाहिजे. सध्या असे होतांना दिसत नाही, ते हिंदूंचे दुर्दैवच, दुसरे काय !
संपादकीय : हरवलेले समाधान !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !
संपादकीय : ‘गांधीवादा’ची कात टाकलेला भारत !