RBI New Rules : रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार ३ प्रकारची खाती होत आहेत बंद !

मुंबई – देशातील वाढत्या बँक फसवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जानेवारीपासून बँकिंग व्यवहार सुरक्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकिंग व्यवस्था अधिक सुरक्षित आणि उत्तम करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यात ३ प्रकारची बँक खाती बंद केली जात आहेत. यामध्ये निष्क्रीय खाते, सक्रीय नसलेली आणि शून्य शिल्लक खात्यांचा समावेश आहे. अशी खाती बंद करण्याचा आर्.बी.आय.ने घेतलेला निर्णय हा ग्राहकांचे संरक्षण आणि बँकिंग क्षेत्राची सुरक्षा राखण्यासाठी आहे.

कोणती खाती बंद होत आहेत ?

१. अनुमाने २ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही, अशी खाती निष्क्रीय खाती मानली जात आहेत. या खात्यांना हॅकर्स आणि फसवणूक करणार्‍यांकडून लक्ष्य बनण्याचा धोका अधिक असतो.

२. जी खाती दीर्घकाळ शून्य शिल्लक ठेवतात त्यांना ‘शून्य शिल्लक खाती’ म्हणतात. रिझर्व्ह बँकेने अशी खाती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

३. या खात्यात गेल्या १२ महिन्यांपासून किंवा त्याहून अधिक काळ कोणतेही व्यवहार झालेले नाहीत त्यांना निष्क्रीय केले जाते. एखाद्या खातेदाराने या कालावधीत कोणतेही व्यवहार केले नाहीत तर, त्यांना बँक शाखेशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांचे खाते पुन्हा सक्रीय करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील, अन्यथा बँक त्यांचे खाते बंद करेल.

खाते बंद होऊ नये; म्हणून करायचे प्रयत्न

बँक खाते बंद होऊ नये; म्हणून खातेधारकाने खाने पुन्हा सक्रीय करण्यासाठी बँक शाखेला भेट दिली पाहिजे. तसेच शून्य शिल्लक असेल, तर खाते तसेच रहाणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.