संपादकीय : जाणत्यांचा निर्णय

 राजस्थानमधील पालडी गावातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित मंडळींनी सार्वजनिकरित्या भ्रमणभाष जाळले

वाढत्या तंत्रज्ञानासह गुन्हेगारीचे प्रमाणही वाढलेले आहे आणि गुन्हेगारी वाढण्याला केवळ नीतीमत्तेचे शिक्षण देणे पुरेसे नसून गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे अन् गुन्हेगारी टाळण्यासाठी तिच्यावर नियंत्रण येण्यासाठी प्रत्येकाला साधना शिकवणे, ही काळाची निकड बनली आहे. भारतात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याबद्दल सरकारी संस्था जागरूकता निर्माण करत आहेत. सायबर गुन्हेगार प्रत्येक मिनिटाला दीड लाख रुपये लुटतात, तर गमावलेले पैसे परत मिळण्याचे प्रमाण केवळ २० टक्के इतकेच आहे, अशी महत्त्वाची माहिती तेलंगाणाच्या आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे उपसचिव भावेश मिश्रा यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये दिली होती. भारत मोठ्या प्रमाणात विकास साध्य करू पहात आहे. ३ जी, ४ जी नंतर आता ५ जी इंटरनेट सुविधा भारतात चालू झाली आहे. त्यातही ५ जी इंटरनेटला गती देण्यासाठी ती सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचा लाभ निश्चितपणे सायबर गुन्हेगार उठवत आहेत, यात वाद नाही. भारतात कोरोना महामारीच्या काळात शिक्षण भ्रमणभाष, संगणक आदी ऑनलाईन माध्यमांद्वारे चालू करण्यात आले होते. याचा परिणाम म्हणून मुले संगणक, भ्रमणभाष हे आता अगदी सहज हाताळतांना दिसतात. अनेक मुलांनी या साधनांचा शिक्षणासह कौशल्य विकासासाठी चांगला उपयोग करून घेतला, तर अनेक मुले नको त्या गोष्टींच्या आहारी गेली. असे दुहेरी परिणाम या तंत्रज्ञानाने सुस्पष्टपणे दाखवून दिले. मुलांकडून या गोष्टींच्या चुकीच्या वापरावर वेळीच चाप लावणे, हे जाणत्या मंडळींसाठी आव्हान ठरले आहे. याविषयी अनेक प्रकारे जागृती केली जात असली, तरी कठोर नियंत्रण आणि शिक्षा हेही अत्यावश्यक आहे.

नुकतेच राजस्थानमधील डीग क्षेत्रातील पालडी गावातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित मंडळींनी या संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले. या भागातून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी होत असल्याने गावकरी चिंतेत होते. सायबर गुन्ह्यांसाठी वापरले जाणारे ३०० भ्रमणभाष आणि ‘सिमकार्ड’ त्यांनी युवक अन् मुले यांच्याकडून काढून घेऊन ते फोडले आणि सार्वजनिकरित्या ते जाळले. सायबर गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या गावाचे आदर्श गावात रूपांतर करण्याचा प्रण येथील जाणत्या ज्येष्ठ मंडळींनी घेतला आहे, तसेच गावातील युवकांना सायबर गुन्हे न करण्याची शपथही घेण्यास बाध्य केले आहे. ‘युवकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी करण्यात आलेली ही सार्वजनिक कृती सध्याच्या काळासाठी महत्त्वाची आहे. युवकांसह लहान वयातील मुलांनाही कमीत कमी वेळेत अधिकाधिक पैसे मिळवण्याचे खुळ जडले आहे. त्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे. भ्रमणभाष आणि इंटरनेट यांच्या साहाय्याने तर हे सहज साध्य होत असल्याने हा प्रकार बराच फोफावला आहे. त्यामुळेच समाजातील प्रत्येकच घटकाला योग्य गोष्टींची, वस्तूस्थितीची जाणीव करून देणे अत्यावश्यक बनले आहे. राजस्थानमधील जाणत्या सूज्ञ मंडळींनी केलेली कृती ही गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा एक चांगला प्रयत्न म्हणता येईल.

सायबर गुन्ह्यांचे अत्यधिक बळी आणि गुन्हेगारही शिक्षितच !

सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अशिक्षित या प्रकाराला बळी पडले, तर त्यांचे तंत्रज्ञानाविषयीचे अज्ञान स्वीकारता येण्यासारखे आहे; परंतु आतापर्यंत या सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्यांमध्ये मोठी संख्या ही शिक्षितांचीच आहे. एका अभ्यासानुसार हे प्रमाण ४८ टक्के इतके आहे. त्याचप्रमाणे अधिक पैसे मिळवणे, वेळ घालवणे, कुटुंबियांपासून दूर रहाणारे स्वतःचा एकाकीपणा दूर करण्यासाठी हे प्रयोग करत असतांना आढळतात. अनेक जण ‘पार्ट टाइम जॉब’ (कमी वेळेची नोकरी) देण्याच्या बहाण्याने, शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैसा मिळवून देणे अशी एक ना अनेक कारणांनी फसवणूक केली जाते आणि लोक त्याला भुलतातही ! आता तर त्याही पुढे म्हणजे कुटुबियांविषयी अफवा पसरवण्याचे प्रकार चालू झाले आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार वर्ष २०२३ मध्ये भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ११ लाख २८ सहस्र २६५ सायबर गुन्हे नोंद झाले, ज्यात वर्ष २०२४ मध्ये निश्चितच मोठी वाढ झाली असणार. जागतिक सर्वेक्षणानुसार सायबर गुन्हेगारीमध्ये भारत जगात १० व्या क्रमांकावर आहे. सायबर फसवणुकीचे एक सामान्य माध्यम म्हणजे खोट्या जाहिराती ! अनेक जण फसवणुकीच्या जाहिराती आणि खोटी खाती यांची ऑनलाइन तक्रार करत नाहीत. इन्स्टाग्राम, एक्स आणि फेसबुक हे सायबर गुन्हेगारांसाठी सर्वांत मोठी फसवणुकीची माध्यमे बनली आहेत. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्थिर रहाण्याच्या इच्छेमुळे ही ऑनलाईन सामाजिक माध्यमे कमकुवत काळात आशेचा किरण असल्याचे भासतात. ज्यातून आर्थिक आणि वैयक्तिक माहिती मिळवून त्याचा गैरवापर केला जातो.

सायबर गुन्हेगारांचे मानसशास्त्र म्हणजे ते प्रथम लोकांची परिस्थिती आणि मनस्थिती समजून घेऊन त्याचे विश्लेषण करतात. ते लोकांची भीती आणि असुरक्षितता शोधून त्याद्वारे त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न करतात. हे एक प्रकारचे मानवी ‘हॅकिंग’ आहे. कायदेशीर संस्थांसाठी काम करून कायदेशीररित्या पैसे कमवण्याची सायबर गुन्हेगारांची क्षमता असते. हे गुन्हेगार संघर्षातून किंवा कठीण पार्श्वभूमी असलेल्या वातावरणातून आलेले नसतात, तर ते सुशिक्षित, ज्ञानी आणि निश्चितच हुशार लोक असतात; परंतु व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी आणि हरवण्यासाठी रोमांचक प्रयोग करत रहातात. सायबर गुन्हे ही एक मानसिक समस्या आहे. ९० टक्क्यांहून अधिक सायबर आक्रमणे ही मानवी चुकांमुळे होतात.

जुन्या-जाणत्या मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे तंत्रज्ञानाने जगाचे वाटोळे केले आहे, असे असले, तरी तंत्रज्ञानाचा विकास करतांनाच त्याच्या चांगल्या-वाईट बाजूंचा आधीच अभ्यास करून वाईट बाजूवर आधीच काम करून त्यानंतरच तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, हा त्यावर पर्याय आहे. तरीही योग्य-अयोग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी मानवातील सद्सद्विवेकबुद्धी केवळ साधना करण्यानेच जागृत होत असल्याने तंत्रज्ञानाचा विकास होत असतांना समाजातील प्रत्येक घटकाने साधना करणे आणि शालेय शिक्षणातही ती अंतर्भूत करणे आवश्यक आहे. तरुण पिढी ही आजच्या भारताची, तर लहान मुले ही उद्याच्या भारताची ओळख आहे आणि भारताचा पाया हा आध्यात्मिकतेवर रचलेला आहे. २१ व्या शतकातील तरुणांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेतला, तर तंत्रज्ञानातील प्रगतीचा योग्य विनियोग निश्चितच साध्य करता येईल.

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या विरोधात केवळ जागृती पुरेशी नसून समाजाला साधना शिकवणे अपरिहार्य !