‘एकदा सनातनच्या आश्रमात एक संत आले होते. ते प.पू. डॉक्टरांशी बोलतांना सहज म्हणाले, ‘‘आमचे साधक माझ्या मागे लागले आहेत की, माझ्या देहत्याग केलेल्या हिमालयवासी गुरूंचे त्यांना प्रकाशरूपात दर्शन हवे आहे. त्यासाठी मीही प्रयत्नरत आहे. त्यांचे दर्शन घडवायचे असेल, तर साधकांकडे साधनेचे तेवढे बळही हवे. मीही त्यांना काही उपासना करण्यास सांगितली आहे. पाहू काय होते ते.’’ त्या दोघांमध्ये चाललेला संवाद मीही तेथे उपस्थित असल्याने ऐकला होता. त्यानंतर ते संत पुढे प.पू. डॉक्टरांना म्हणाले, ‘‘तुमच्या साधकांनाही दर्शन घडवू का ?’’ यावर गुरुदेव म्हणाले की, ‘‘आपली कृपा महत्त्वाची आहे. दर्शन काय क्षणिक असते; परंतु आपली आणि आपल्या सद्गुरूंची कृपा सनातनच्या साधकांवर अखंड राहो, हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो.’’
गुरुदेवांनी दिलेल्या या उत्तरावरून मला शिकायला मिळाले की, संतांकडेही काय मागायचे ?, हे कळले पाहिजे. त्यासाठी प.पू. डॉक्टरांसारखी अधिकारी व्यक्तीच हवी. प.पू. डॉक्टरांच्या बोलण्यावरून कृपेचे महत्त्वही कळले. संतांचे दर्शन तात्कालिक असते, तर त्यांची कृपा निरंतर कार्य करते. त्यामुळे जीवनात गुरुकृपाच महत्त्वाची आहे. जीवनात गुरुकृपेचे महत्त्व लक्षात आणून देणार्या गुरुदेवांच्या चरणी आम्ही साधक कोटीशः वंदन करतो.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तमिळनाडू.