श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जो काही आध्यात्मिक अधिकार प्राप्त केला आहे, त्यासाठी त्यांनी जे काही कष्ट सोसले आहेत, त्यांपैकी सूक्ष्मज्ञानप्राप्तीची सेवा करतांना त्यांच्यावर झालेल्या अनिष्ट शक्तींच्या आक्रमणामुळे त्यांना झालेले त्रास, त्यातही त्यांनी जिद्दीने केलेली साधना, त्यांच्यातील ‘प्रबळ इच्छाशक्ती आणि गुरूंवरील अढळ श्रद्धा’ या दैवी गुणांमुळे त्यांनी रात्रंदिवस अविरत केलेली सेवा, आदी गोष्टी आपण विशेष पुरवणीच्या पृष्ठ ४ वरील लेखात पाहिल्या. या ठिकाणी त्यांनी समष्टीसाठी म्हणजे साधक, धर्मकार्य आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी घेत असलेले कष्ट यांविषयी देत आहे.
संगीताच्या माध्यमातून सेवा करतांना घेतलेले कष्ट आणि सोसलेले त्रास !
१. देवतांचे तारक-मारक नामजप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अपेक्षित असे ध्वनीमुद्रित होईपर्यंत प्रयत्न करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे संगीताचे शिक्षण झाल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्वांत प्रथम त्यांना संगीताच्या माध्यमातूनच सेवा करण्यास सांगितले. समष्टीसाठी उपयुक्त असे विविध देवतांचे नामजप त्यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करून घेतले. एकेका देवतेचा नामजप सिद्ध करत असतांना त्यांना एक एक नामजप अनेक वेळा म्हणावा लागत असे. जोपर्यंत त्या नामजपातून अपेक्षित अशी तारक किंवा मारक स्पंदने प्रक्षेपित होत नसत, तोपर्यंत तो नामजप अंतिम होत नसे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ‘नामजपाची गती, लय, दोन शब्दांमधील अवकाश’ इत्यादी अनेक बारकाव्यांसंबंधी सुधारणा सांगायचे. त्यासाठी श्रीचित्शक्ति गाडगीळ यांना तो नामजप अनेक वेळा पुनःपुन्हा म्हणावा लागायचा; परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही.
२. संगीतातील रागांविषयी संशोधन करत असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सूक्ष्म-युद्धाचे अनेक परिणाम सोसावे लागणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘संगीतातील विविध रागांचा समष्टीवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यासही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून करून घेतला. संगीतातील रागांचे संशोधन करत असतांना समष्टीसोबतच श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावरही त्या रागांचे परिणाम व्हायचे आणि त्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागायचा, उदा. एकदा ‘दीप’ या रागाविषयी संशोधन चालू होते. हा राग म्हणत असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या शरिरामध्ये पुष्कळ उष्णता निर्माण झाली आणि त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. शेवटी त्यांना ती उष्णता सोसवली नाही. त्यामुळे प्रयोग त्या ठिकाणी थांबवावा लागला.
त्या कालावधीत श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी अशा प्रकारचे बरेच प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजे वातावरणातील अनिष्ट शक्तींशी एक प्रकारचे सूक्ष्मातील युद्धच होते. रागांच्या सूक्ष्मातील परिणामांमुळे बर्याच साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून झाले. कदाचित ‘आज आपण जी काही सेवा करू शकत आहोत, ती श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचीच कृपा आहे’, असे मला वाटते.
लोकांशी जवळीक करण्याची हातोटी असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ !
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची इतरांशी जवळीक करण्याची हातोटीही पुष्कळ वेगळी आहे. काही ठिकाणी गैरसमजातून सनातनला विरोध करणारे लोक होते; परंतु श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांचा विरोध मावळून ते सनातनविषयी आत्मीयतेने ऐकून घेत आणि कार्यासाठी साहाय्य करायलाही सिद्ध होत.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी गुरुकार्यातून कधीही माघार घेतल्याचे माझ्या ऐकिवात नाही. त्यासाठी त्या काहीही करायला सिद्ध असत. अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये किंवा तीर्थक्षेत्री त्या त्या ठिकाणच्या कार्यपद्धतीनुसार किंवा काही धर्मद्रोही लोकांमुळे चित्रीकरणाला अनुमती मिळत नसे किंवा अपेक्षित आणि आवश्यक अशी माहिती मिळत नसे; परंतु त्याही परिस्थितीत श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ‘कशा प्रकारे अन्य लोकांशी जवळीक साधून आध्यात्मिक माहिती घेता येईल’, हे पाहून कार्यपूर्ती करत असत. त्या लोकांना आध्यात्मिक संशोधनाचा भाग समजावून सांगत आणि ‘त्यांनी अनुमती दिल्यास पुढील अनेक पिढ्यांचा उद्धार होणार असून नवीन पिढ्यांना ती माहिती मिळणार आहे’, असे प्रबोधन करून लोकांकडून धर्मकार्य करून घेत. श्रीचित्शक्ति काकू यांच्या प्रीतीमुळे त्यांनी जोडलेले लोक खर्या अर्थाने सनातनचे हितचिंतक झाले आहेत. बहुतेक सर्वच जण आजही त्यांच्या संपर्कात आहेत. ते ‘श्रीचित्शक्ति काकू कधी एकदा त्यांच्या परिसरात येतील’, याची आतुरतेने वाट पहात असतात. ते श्रीचित्शक्ति काकू यांच्या सांगण्यावरून त्यांच्या परीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात हातभार लावत आहेत. काही संत हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी निरंतर यज्ञ, अनुष्ठाने आदी करत असतात.
साधक आणि धर्मकार्य यांसाठी अत्यंत खडतर दैवी दौरे आजही चालूच !
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे कष्ट एवढ्यावरच थांबलेले नाहीत. आजही त्या गावोगावी दैवी दौरे करून साधकांना आणि धर्मकार्याला संत अन् देवता यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी धडपडत आहेत. त्यांचा प्रवास वाटतो, तेवढा सोपा नसतो. त्यांना महर्षींकडून केव्हाही आज्ञा येते आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आज्ञापालन म्हणून दिवस-रात्र असे काही न पहाता त्या क्षणाला प्रवासाला आरंभ करतात. काही ठिकाणचा प्रवास अत्यंत खडतर, काट्याकुट्यांतून, तसेच डोंगरदर्यांतून जाणारा असतो. जेथे सामान्यपणे तरुणांनाही चढणे-उतरणे अवघड असते. अशा ठिकाणीही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या वयात अविश्रांत प्रवास करत आहेत. हे करत असतांना त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास होतात. आजही अनिष्ट शक्तींची अनेक आक्रमणे होत असल्यामुळे त्यांच्या अवयवांची झीज होत आहे, तरीही समष्टीसाठी त्या अविरतपणे झटत आहेत.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आतापर्यंत ‘डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यांना अंधूक दिसणे, तोंड येणे, दातांचा त्रास, कानाचे त्रास, ऐकायला अल्प येणे, अंगावर सूज येणे’, असे कितीतरी प्रकारचे त्रास सहन केले आहेत. हे सर्व पाहिल्यावर साहजिकच मनात विचार येतो, ‘जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ।’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा वारसा खर्या अर्थाने पुढे चालवणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जेव्हा धर्मप्रसारासाठी बाहेर जात, तेव्हा ते समाजातील अनेक साधकांना हेरत आणि त्यांना साधनेत पुढे आणत. या व्यतिरिक्त ‘समाजात कोण संत आहेत ?’, हेसुद्धा ते नेमकेपणाने हेरून त्यांचा सन्मान करत. हाच भाग श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी पुढे चालू ठेवला. त्यांनीसुद्धा अनेक साधकांच्या साधनेची पारख करून त्यांना समष्टीसमोर आणले. समाजातील अनेक संतांनाही ओळखून त्यांचे आशीर्वाद सनातन संस्थेला प्राप्त करून दिले. प्रत्येक संत त्यांच्या साधनामार्गाप्रमाणे भिन्न भिन्न प्रकृतीचे असतात. असे असूनही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ त्यांच्याशी अतिशय विनम्रतेने जवळीक साधून साधकांना त्यांच्या चैतन्याचा लाभ मिळवून देत आहेत. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या संपर्कामुळेच अनेक संतांनी सनातन संस्था आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी त्यांच्या साधना मार्गानुसार अनेक अनुष्ठाने केली अन् सनातनला आध्यात्मिक बळ पुरवले.
कृतज्ञता
संत आपल्यासमोर सतत हसतमुख राहून आपल्याला चैतन्य प्रदान करत असतात; परंतु त्यासाठी त्यांना किती कष्ट झेलावे लागतात, हे मात्र ते आपल्याला कधीच कळू देत नाहीत. हाच भाग श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या संदर्भातही लक्षात येतो. त्यांच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, सनातन प्रभात. (१९.११.२०२४)
|