वीज खात्याकडून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा
पणजी, १० डिसेंबर (वार्ता.) – भविष्यात औष्णिक ऊर्जेचा दीर्घकाळ वापर करणे शक्य नसल्याने इतर पर्यायी ऊर्जास्रोतांकडे वळणे आवश्यक आहे, असे वक्तव्य वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. कांपाल येथील कला अकादमीमध्ये १० डिसेंबर या दिवशी ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह २०२४’च्या निमित्ताने वीज खात्याच्या राज्य नियुक्त एजन्सीकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘कोळशापासून निर्माण होणार्या ७२ टक्के औष्णिक ऊर्जेमुळे प्रदूषण होते. भूमीतून काढलेल्या कोळशाचा हा स्रोत दिवसागणिक न्यून होत आहे. भविष्यात औष्णिक ऊर्जेचा दीर्घकाळ वापर करणे शक्य नाही. त्यामुळे इतर ऊर्जा स्रोतांकडे वळण्याची आवश्यकता आहे. ‘सप्ताह’ थाटामाटात आणि उत्साहात साजरा करूनही लोक निष्काळजीपणे वागत असल्याचे दिसून येते. नैसर्गिक संसाधनांच्या वापराविषयी लोकांनी गांभीर्याने आणि विवेकपूर्ण वागले पाहिजे. भविष्यात अक्षय्य ऊर्जा, हरित ऊर्जा अशा ऊर्जास्रोतांचा विचार करण्याची वेळ आली आहे. हे स्रोत भावी पिढ्यांसाठी जतन करावे लागतील.’’
मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस म्हणाले, ‘‘पर्यावरणाच्या विनाशाची किंमत मोजून आपण विकासाची अपेक्षा करू शकत नाही. निसर्गाच्या प्रकोपामुळे मानवाला जीव गमवावा लागेल. निसर्गाचे स्रोत आपल्या गरजेसाठी आहेत, लोभासाठी नाहीत. एकटे सरकार ऊर्जा संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही, तर त्यासाठी समाजाचे सहकार्य आवश्यक आहे.’’
ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याच्या उद्देशाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर नाटक, पोस्टर (भित्तीपत्रक), चित्रकला, निबंध, पथनाट्य, रेखाचित्र इत्यादी विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ऊर्जा संवर्धनाविषयीचा उत्कृष्टतेचा पुरस्कार नगरपालिका स्तरावर पणजी महानगरपालिकेला, तर पंचायत स्तरावरील पुरस्कार कुर्टी-खांडेपार ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. इतर विविध स्पर्धांची पारितोषिकेही या वेळी वितरित करण्यात आली.