मध्‍यरात्रीपर्यंत ध्‍वनीवर्धक चालू ठेवणार्‍या कल्‍याणीनगरमधील हॉटेल मालकावर गुन्‍हे नोंद !

पुणे – कल्‍याणीनगर भागातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर या भागात मध्‍यरात्रीपर्यंत चालू रहाणारे हॉटेल, पब विरोधात नागरिकांनी तीव्र रोष व्‍यक्‍त करत तक्रारी केल्‍या होत्‍या. (नागरिकांना तक्रारी का कराव्‍या लागतात ? पोलीस गस्‍त घालतात, तर त्‍यांना हे अपप्रकार दिसत नाहीत का ? अशा पोलिसांवरही कठोर कारवाई होणे आवश्‍यक ! – संपादक) पोलीस प्रशासनाने कारवाई करून २० पेक्षा अधिक पब विरोधात कारवाई केली होती; मात्र त्‍यानंतर या भागातील हॉटेल, पब पुन्‍हा मध्‍यरात्रीपर्यंत चालू झाले आहेत. रात्री विलंबापर्यंत हॉटेल चालू असल्‍याने तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. पोलीस आयुक्‍तांचे आदेश धुडकावून हॉटेलमध्‍ये मध्‍यरात्रीपर्यंत साऊंड सिस्‍टीम चालू ठेवली होती. या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रवीण खाटमोडे यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून येरवडा पोलिसांनी २ हॉटेल मालकांविरोधात गुन्‍हा नोंद केला आहे. कुकू हॉटेलचे मालक खुशबू वर्मा, व्‍यवस्‍थापक फैयाज फकिराउद्दीन मीर, हॉटेल ओआयब्रूचे मालक अमन प्रेम तलरेजा आणि व्‍यवस्‍थापक निखिल बेडेकर अशी त्‍यांची नावे आहेत.