पिंपरी (पुणे) – चिखली, कुदळवाडी भागातील विनापरवाना भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोर यांवर कठोर कारवाई करावी. त्यासाठी पोलीस, प्रशासनासह अन्य सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे ‘अ ॅक्शन प्लॅन’ (प्रत्यक्ष कृती करण्याचे नियोजन) सिद्ध करावा आणि त्वरित कारवाईस प्रारंभ करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले आहे. (असे निर्देश का द्यावे लागतात ? पोलीस आणि प्रशासन यांना हे दिसत नाही का ? – संपादक) या भंगार व्यवसायामध्ये बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या लोक काम करतात. ही शहराच्या दृष्टीने गंभीर गोष्ट असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.
आमदार लांडगे पुढे म्हणाले की, चिखली येथील कुदळवाडी परिसरातील भंगार गोदामासह काही दुकाने आणि लघुउद्योग आस्थापने यांना आग लागली. या भागात भंगार व्यावसायिकांची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेकदा तक्रार आणि कारवाई करूनही पुन्हा या ठिकाणी भंगाराचा धंदा केला जातो. अनधिकृतपणे कचरा जाळला जातो. त्यामुळे अनेकदा आगीच्या घटना घडलेल्या आहेत. परिणामी येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.