हिंदु एकता आंदोलन आणि शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन संघटनांची मागणी !
सातारा, १० डिसेंबर (वार्ता.) – प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानवधाच्या जागेजवळ १६ फेब्रुवारी २०२५ या शिवजयंतीपूर्वी अफझलखानवधाचे म्हणजेच शिवप्रतापाचे सिद्ध झालेले शिल्प तातडीने बसवण्यात यावे, अशी मागणी ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन’ आणि ‘हिंदु एकता आंदोलन’ यांच्या वतीने सातारा अपर जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ८ डिसेंबर या दिवशी जिल्ह्यातील प्रतापगड येथे हिंदुत्वनिष्ठांनी ‘शिवप्रतापदिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी प्रतापगडावर शिवरायांच्या पुतळ्याचा परिसर फुले आणि भगवे झेंडे लावून सजवण्यात आला होता. हिंदुत्वनिष्ठांनी हातात भगवे ध्वज आणि ‘अफझलखानवधा’चे फलक हाती घेतले होते. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक श्री. नितीन शिंदे, माजी नगरसेविका सौ. स्वाती शिंदे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, शहर उपाध्यक्ष श्री. राजू जाधव, सांगलीवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, खणभाग विभाग अध्यक्ष श्री. अवधूत जाधव आदी उपस्थित होते.
अफझलखान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्यासमोर अफझलखानवधाचे म्हणजे शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभे करून परिसराचे नामकरण ‘श्री शिवप्रतापभूमी’ असे करावे, अशा आशयाचे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिले होते. त्यानुसार मंगलप्रभात लोढा यांनी निविदा मागवून या शिल्पाचे काम पुणे येथील शिल्पकार दीपक थोपटे यांना दिले आहे.