कारखाने आणि हॉटेलचालक यांनी कचरा उघड्यावर टाकल्यास कठोर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

हरवळे (गोवा) येथे कचरा प्रकल्पाचे उद्घाटन

डिचोली, १० डिसेंबर (वार्ता.) – गोवा राज्य ‘स्वच्छ, सुंदर आणि आत्मनिर्भर’ करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. असे असतांनाही काही औद्योगिक कारखाने आणि हॉटेलचालक त्यांचा कचरा गावाच्या वेशीवर आणून टाकत आहेत. अशा प्रकारांत वाढ झालेली आहे आणि हे प्रकार त्वरित थांबवावे, अन्यथा सरकार संबंधितांची वीज आणि पाणी यांची जोडणी तोडणे अन् आस्थापनांना टाळे ठोकणे, अशी कठोर कारवाई करणार आहे. गावाच्या वेशीवर कचरा टाकतांना आढळल्यास त्याच्यावर केवळ पंचसदस्यानेच नव्हे, तर गावातील सामान्य नागरिकानेही केलेल्या पोलीस तक्रारीची नोंद घेतली जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. हरवळे पंचायत क्षेत्रात ‘कचरा व्यवस्थापन शेड’च्या (‘एम्.आर्.एफ्.’च्या – ‘मटेरियल रिकव्हरी फेसिलिटी’च्या) उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, सरपंच गौरवी नाईक आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘राज्यात सध्या हॉटेल आणि औद्योगिक कचरा यांची मोठी समस्या लक्षात घेऊन सरकारने त्यावर प्रक्रियेसाठी कचरा व्यवस्थापन महामंडळ, घनकचरा व्यवस्थापन यांच्या माध्यमातून प्रक्रिया चालू केली आहे. यामध्ये सरकारला जर १०० टक्के यश आले, तर गोवा स्वच्छ आणि सुंदर राज्य बनणार. यासाठी हॉटेलचे चालक आणि औद्योगिक आस्थापने यांनी सरकारला सहकार्य करावे. सरकार या कचर्‍यासाठी सर्वतोपरी साधनसुविधा आणि इतर सहकार्य देण्यास सिद्ध आहे’’.

हरवळे पंचायतीचा आदर्श सर्वांनी घ्यावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘हरवळे येथील कचरा प्रकल्पात सुका कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या कचर्‍यातून पंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. अशा प्रकल्पामुळे कचरा व्यवस्थापनावर निश्चितपणे मार्ग काढणे सोपे होणार आहे. या ठिकाणी ‘बिसलरी नॅशनल’, ‘अर्थ इंटरनॅशनल’, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, ‘मिनरल फाऊंडेशन ऑफ गोवा’ यांच्या सहकार्याने कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. येथे २० ते २२ लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. हरवळे पंचायतीचा आदर्श इतर पंचायतींनी घ्यावा.’’