शिवमय वातावरणात आणि उत्‍साहात प्रतापगड येथे ‘शिवप्रतापदिन’ साजरा

छत्रपतींच्‍या अश्‍वारूढ मूर्तीवर हेलिकॉप्‍टरमधून पुष्‍पवृष्‍टी

सातारा, १० डिसेंबर (वार्ता.) – अलोट उत्‍साहात ८ डिसेंबर या दिवशी प्रतापगडावर ‘शिवप्रतापदिन’ मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. ढोल ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांचकारी तुतार्‍या आणि हेलिकॉप्‍टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या अश्‍वारुढ मूर्तीवर पुष्‍पवृष्‍टी यामुळे सर्व वातावरण शिवमय झाले होते.

सकाळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस्., पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्‍हाधिकारी जीवन गलांडे यांच्‍या हस्‍ते भक्‍तिमय वातावरणात श्री भवानीमातेची महापूजा करण्‍यात आली. पुजारी शंकर गुरुजी यांनी या पूजेचे पौरोहित्‍य केले.

श्री भवानीमातेच्‍या मंदिरासमोर ध्‍वजस्‍तंभाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पूजन झाले. भगव्‍या ध्‍वजाचे ध्‍वजारोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्‍या हस्‍ते केले. मानाच्‍या पालखीची मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पूजा करण्‍यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीची पालखीतून मिरवणूक चालू झाली. पोलीस अधीक्षक, अपर जिल्‍हाधिकारी यांच्‍यासह सर्व उपस्‍थित मान्‍यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्‍थ केली. जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा जावली, दरे, वाडा कुंभरोशीच्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनींचे लेझीम-तुतार्‍या, काठीवर चालणारी मुले, आई भवानीमातेचा आणि शिवरायांचा जयजयकार करणार्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून  गेला.