नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी शपथ घेतली. गेल्या काही वर्षांत २-३ पक्षांचे सरकार सत्तेत आले की, त्या त्या राज्यात उपमुख्यमंत्री करण्याची पद्धत रूढ झाली आहे. असे असले, तरी ‘उपमुख्यमंत्री हे पद राज्यघटनेत अस्तित्वात आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर शोधल्यास कळते, ‘राज्यघटनेत असे पद अस्तित्वात नाही.’ देशाच्या अनेक राज्यांत उपमुख्यमंत्री आहेत. ‘मुख्यमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदासाठी सरसकट शपथ घेतली जात असली, तरी उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ घटनात्मक का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. आतापर्यंतच्या या वादावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याचे टाळले आहे.
सर्वोच्च न्यायालयात उपपंतप्रधानपदाच्या शपथेला आव्हान
वर्ष १९८९ मध्ये व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. देवीलाल यांच्या शपथेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते; कारण ‘राज्यघटनेत हे पदच अस्तित्वात नाही’, असा युक्तीवाद करण्यात आला होता. यावर सरकारच्या वतीने तत्कालीन महाअधिवक्ता सोली सोराबजी यांनी युक्तीवाद करतांना ‘देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली असली, तरी लेखी शपथपत्रावर मंत्री म्हणून स्वाक्षरी केली आहे’, असा दावा केला होता. ‘त्यांना केवळ मंत्र्यांचेच अधिकार असतात’, हा तत्कालीन महाधिवक्ता सोली सोराबजी यांचा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला होता.
उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली, तरी अधिकार मंत्रीपदाचेच !
पंतप्रधान वा मुख्यमंत्री, तसेच मंत्री हे ‘पद’ आणि ‘गोपनीयता’ अशा २ शपथा घेतात. पहिल्या भागात वर्णनात्मक शपथेत ‘नाव आणि पद’, अशी पदाची शपथ असते. दुसर्या भागात ‘राज्यघटनेशी एकनिष्ठ रहाण्याची’ शपथ घेतली जाते. ‘पहिल्या वर्णनात्मक भागात एखादी चूक झाली वा त्रुटी राहिल्या, तरीही ही शपथ चूक ठरत नाही’, असाही दावा महाधिवक्ता सोराबजी यांनी केला होता. ‘देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली असली, तरी त्यांना मंत्रीपदाचेच सारे अधिकार असतील’, असेही स्पष्ट केले होते.
यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून वर्ष १९९५ मघ्ये घेतलेल्या शपथेस मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तमिळनाडूमधील पनीरसेल्वम् यांच्या उपमुख्यमंत्रीपदासही मद्रास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, हेही लक्षात घ्यायला हवे.
(साभार : संकेतस्थळ)