SC On Allahabad HC Judge Speech : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या भाषणाची सर्वोच्च न्यायालयाने मागवली माहिती

न्यायमूर्ती यादव यांनी विहिंपच्या कार्यक्रमात ‘देश बहुसंख्यांकांच्या इच्छेनुसारच चालणार’, असे केले होते विधान !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव

नवी देहली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी ३ दिवसांपूर्वी उच्च न्यायालयातील ग्रंथालयाच्या सभागृहात समान नागरी कायद्याच्या संदर्भातील विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यक्रमात काही विधाने केली होती. त्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने मागवली आहे. न्यायमूर्ती यादव यांनी आक्षेपार्ह विधाने केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे.

‘कॅम्पेन फॉर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी अँड रिफॉर्म्स’ या सामाजिक संस्थेने सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती यादव यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कार्यालयांतर्गत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भारतीय मुसलमानांना लक्ष्य करण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात न्यायमूर्ती यांनी, ‘देशात रहाणार्‍या बहुसंख्य लोकांच्या इच्छेनुसार हिंदुस्थान चालेल आणि हा कायदा आहे. कायदा बहुसंख्यांकांनुसार चालतो. त्याला कुटुंब किंवा समाज यांच्या संदर्भात पाहिल्यास बहुसंख्यांकांचे कल्याण आणि सुख ज्यात लाभते तेच मान्य केले जाईल’, असे म्हटले होते.