बजरंग दलाकडून कुडचडे (गोवा) येथे ८ डिसेंबरला शौर्ययात्रा आणि शौर्यसभा

हिंदु युवकांचे प्रेरणास्रोत भाजपचे आमदार टी. राजासिंह मार्गदर्शन करणार

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. कपिलदत्त आर्सेकर, श्री. मोहन आमशेकर आणि श्री. विराज देसाई

पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – बजरंग दलाकडून कुडचडे येथे रविवार, ८ डिसेंबर या दिवशी शौर्ययात्रा आणि शौर्यसभा यांचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयीची माहिती ५ डिसेंबरला बजरंग दलाच्या वतीने पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला विश्व हिंदु परिषदेचे श्री. मोहन आमशेकर, बजरंग दलाचे श्री. विराज देसाई, श्री. कपिलदत्त आर्सेकर आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे गीता जयंतीनिमित्त ८ डिसेंबरला दुपारी ३ वाजता तिस्क, सावर्डे येथून शौर्ययात्रेचा आरंभ होणार असून या शौर्यसंचलनाचा कुडचडे बाजार येथे समारोप होणार आहे. या ठिकाणी होणार्‍या विराट शौर्यसभेत भाग्यनगरचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह हे गोव्यातील युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी सभास्थानी श्रीमद्भगवद्गीता पूजन आणि ढोलताशांच्या गजरात रोमटामेळाद्वारे हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. यामध्ये दुर्गा वाहिनीच्या युवतीही सहभागी होणार आहेत.

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल गोमंतक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या हिंदूशक्ती प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री. मोहन आमशेकर यांनी केले. पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तरे देतांना ते म्हणाले, ‘‘कुडचडे येथील शौर्ययात्रेत राजासिंह यांना बोलावल्याबद्दल या यात्रेवर बंदी घालण्याची काही जण मागणी करत आहेत. कुणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. ही सभा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. भीती कुणाला वाटली पाहिजे ? जे अराष्ट्रीय घटक आहेत, जे हिंदूंच्या मंदिरांवर, साधू-संतांवर आक्रमणे करतात, जे गोहत्या करतात, हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवतात, त्यांना मात्र भीती वाटायला पाहिजे. सर्वसाधारण जनतेने घाबरायची आवश्यकता नाही. या यात्रेत १३-१४ सहस्र हिंदू सहभागी होतील, असा अंदाज आहे. संपूर्ण देणात शौर्ययात्रा होणार तशी ही यात्रा आहे.’’

या शौर्ययात्रेच्या आयोजनाची त्यांनी वेलवाडा, पैंगीण आणि भगतवाडा, काणकोण येथे बैठकांमधून माहिती दिली.