प्रशासनाने कारवाई न केल्यास कर्ली खाडीच्या पात्रात उतरून वाळूच्या अवैध उपशाला विरोध करू ! – वाघवणे ग्रामस्थांची चेतावणी

मालवण – तालुक्यातील वाघवणे कर्ली खाडी येथे अवैधरित्या वाळू उत्खनन चालू आहे. याच्या विरोधात कारवाई न झाल्यास खाडीपात्रात उतरून वाळू उत्खननाला विरोध करावा लागेल, अशी चेतावणी वाघवणे येथील ग्रामस्थांनी तहसीलदार वर्षा झालटे यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

कर्ली खाडीवर असलेल्या पुलाच्या जवळ पूर्वेकडे आमची घरे, मांगर (शेतातील लहान घर), भातशेती, माडबागायती आदी आहेत. सध्या वाघवणे आणि आंबेरी या गावांच्या सीमेवर असलेल्या रेतीच्या क्षेत्रात रात्रंदिवस बेसुमार वाळूचे उत्खनन चालू आहे, तसेच रात्रीच्या वेळी कर्ली पुलापासून ३०० मीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रातही अवैधरित्या वाळूचे उत्खनन चालू आहे. यामुळे पुलासह आमची घरे, शेती, बागायती, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी यांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैधरित्या होणार्‍या वाळू उत्खननावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा आम्ही विरोध करतांना अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन उत्तरदायी असेल, असे या निवेदनात म्हटले आहे. ग्रामस्थांनी निवेदन दिल्यानंतर तहसीलदार झालटे यांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी आणि खाडी यांमध्ये अवैधरित्या वाळूचे उत्खनन केले जाते. त्यामुळे शेती, बागायती यांची हानी होण्यासह काही ठिकाणी घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याला ग्रामस्थ सातत्याने विरोध दर्शवतात, तसेच हे प्रकार थांबण्यासाठी प्रशासनाला निवेदन देतात. तरीही प्रशासन कायमचा वचक बसेल, अशी कारवाई वाळू माफियांवर करत नाही नसल्याने असे प्रकार सातत्याने होतात. – संपादक)